जळगाव - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायांवर कडक निर्बंध लादले आहेत. गेल्या महिनाभरापासून हीच स्थिती असल्याने, सोने-चांदीच्या व्यापारासाठी 'सुवर्णनगरी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावातील सराफ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कडक निर्बंधांमुळे गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया यासारखे महत्त्वाचे मुहूर्त हातून निघून गेले. आता लग्नसराईत पण व्यवसाय ठप्प असल्याने सराफ व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. सरकारने किमान आठवड्यातून 3 दिवस 4 तास व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
सोने व चांदीच्या व्यापारासाठी जळगाव देशभर प्रसिद्ध आहे. येथील व्यवहार हा सचोटीचा मानला जातो. त्यामुळे दररोज सोने-चांदीच्या खरेदी व विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सराफ व्यवसाय धोक्यात येऊ पाहत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत येथील सराफी पेढ्या साधारणपणे 6 ते 7 महिने बंद होत्या. त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरली. सराफ व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट धडकली, आणि पुन्हा एकदा राज्य सरकारने कडक निर्बंध लादले. अशात सराफ व्यावसायिक संकटात सापडले आहेत.
ऐन हंगामात दुकाने आहेत बंद -
सराफ व्यावसायिकांच्या अडचणींबाबत जळगावातील प्रसिद्ध आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक पप्पू बाफना 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, दरवर्षी दसरा-दिवाळीच्या सणांपासून ते जून महिन्यापर्यंतचा काळ हा सराफ व्यवसायासाठी सुवर्णकाळ मानला जातो. या काळात जळगावच्या सराफ बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून खूप वाईट परिस्थिती आहे. गेल्यावर्षी देखील कोरोनामुळे लॉकडाऊन होता. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया यासारख्या सणांचा तेव्हा मुहूर्त हुकला. यावर्षी पण तीच स्थिती आहे. एकेक मुहूर्त हातून निघून जात आहे. त्याचा मोठा फटका आम्हाला सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, कोरोनामुळे लग्नसराईवरही परिणाम झाला आहे. अनेकांनी लग्न सोहळे पुढे ढकलले आहेत. याचाही परिणाम सराफ व्यवसायावर झाला आहे. काही जण मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे उरकून घेत आहेत. असे लोक सोने खरेदीसाठी इच्छुक असतात. पण दुकाने बंद असल्याने सोने व चांदीची विक्री करता येत नाही. एकूणच काय तर, राज्य सरकारने लादलेले कडक निर्बंध आमच्यासाठी मारक आहेत, असे बाफना म्हणाले.
हेही वाचा - जळगाव : कोरोनाचे नियम मोडणे काँग्रेस नेत्यांना भोवले, अजिंठा विश्रामगृहातील बैठक प्रकरणी गुन्हा दाखल
कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प -
जळगावातील सराफ बाजारात मुहूर्त नसताना दररोज 60 ते 70 लाख रुपयांची उलाढाल होते. सणासुदीच्या काळात हा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असतो. पण कडक निर्बंधांमुळे सराफ बाजारात एक रुपयाचीही उलाढाल नाही. गेल्या महिनाभराचा विचार केला तर शेकडो कोटींची उलाढाल ठप्प आहे. यामुळे जळगावच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे, असेही सराफ व्यावसायिक पप्पू बाफना यांनी सांगितले.
राज्य सरकारने आमचा विचार करावा -
कोरोनामुळे गेल्या वर्षापासून सराफ व्यवसायाचे अर्थचक्र दोलायमान झाले आहे. सराफ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आता नियमावली शिथिल करण्याची गरज आहे. सोने व चांदीच्या खरेदी-विक्रीसाठी ग्राहकांची खूप गर्दी होत नसते. मोजके लोक दुकानांमध्ये येतात. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील व्यवसायांप्रमाणे आम्हालाही आठवड्यातून किमान 3 दिवस दररोज 4 तास व्यवसाय करू दिला पाहिजे. जेणेकरून सराफ व्यवसायाचे अर्थकारण सुरळीत होऊ शकेल, अशी मागणीही बाफना यांनी केली.
तर सरकारलाही महसूल मिळेल -
सराफ व्यवसायाला सशर्त परवानगी दिली तर राज्य आणि केंद्र सरकारला कराच्या माध्यमातून महसूल मिळू शकतो. सोने व चांदीच्या आयात-निर्यातीतून केंद्र सरकारला एकूण व्यवहाराच्या रकमेवर 7 टक्के कस्टम ड्युटी मिळते. स्थानिक व्यवहारातून 3 टक्के जीएसटी आणि एसजीएसटी असे कर मिळतात. सद्यस्थितीत सराफ व्यवसाय ठप्प असल्याने केंद्र व राज्य सरकारला कर स्वरूपात मिळणारा महसूल देखील बुडत आहे. याचाही विचार सरकारने करायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - जळगावात 'म्युकर मायकोसिस'वरील इंजेक्शनचा तुटवडा