जळगाव - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप लक्षात घेता, सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरातही नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. मात्र, शहरातील नागरिक त्याला वाटाण्याच्या अक्षदाच लावत आहेत. गुरुवारी रस्त्यांवरील गर्दी बघता शहरातील लॉकडाऊन संपला की काय? असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ या आजाराने अख्खे जग चिंतेत आहे. शहरातही कोरोना झपाट्याने पाय पसरवत असून, जळगाव शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता शंभरावर पोहोचली आहे. असे असतानाही नागरिक गर्दीत जाण्याचे टाळताना दिसत नाहीत. यामुळे समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासूनच शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सुरुवातीपासून लोक भाजीपाला खरेदीसाठी, औषध खरेदीसाठी, रुग्णालयात जातोय, असे सांगत काही ना काही कारण काढून घराबाहेर पडत आहेत.
नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य घेऊन घरीच रहावे
शहरातील बहुतांश दुकाने, कार्यालये बंद आहेत; मात्र या कार्यालयांसमोर वाहनांच्या रांगा दिसत असल्याने लॉकडाऊन संपण्यापूर्वी दुकाने, कार्यालये सुरू झाले की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घराबाहेर पडू नये, असे आवाहन डॉक्टर, पोलीस यांच्यातर्फे वारंवार केले जात आहे.
कारवाई कमी झाल्याने नागरिकांचा वावर वाढला
सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून, कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्कपणे शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले जात आहे; परंतु, दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत.