जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या काळात गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाचा एकही संशयित रुग्ण नसल्याने एकाचेही रक्ताचे नमुने संकलित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात या तीन महिन्यात डेंग्यू आणि मलेरिया आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सद्यस्थितीत जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या दप्तरी नोंद असलेले जे काही २६ रुग्ण आहेत; ते जानेवारी ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान आढळून आले आहेत.
दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू आणि मलेरिया आजारांबाबत जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असते. शहरी तसेच ग्रामीण भागात विविध शाळांमध्ये, रॅली काढून, विविध सभा आणि कार्यक्रमांमध्ये डेंग्यू, मलेरिया आजाराबाबत जनजागृती केली जाते. मात्र, कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून हे सर्व उपक्रम जवळपास ठप्प आहेत. शिवाय कोरोनाच्या संसर्गामुळे तापाचे रुग्ण खासगी रुग्णालयात शक्यतोवर दाखल करून घेतले जात नाहीत.
खासगी रुग्णालयांकडून येणारे डेंग्यूसदृश्य रुग्णांचे रक्ताचे नमुनेच संकलित झालेले नाहीत. म्हणजेच संशयित रुग्णच समोर आलेले नसल्याने गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात एकाचीही रक्त तपासणी झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाचा एकही रुग्ण नसल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, डेंग्यू, मलेरियाची लक्षणे जवळपास कोरोनासारखीच असल्याने एखाद्या व्यक्तीला ताप आला, अंगदुखी तसेच अशक्तपणा जाणवत असला तर त्यावर कोरोना संशयित म्हणून उपचार केले जात आहेत. हा प्रकार जळगाव जिल्ह्यात सुरू असल्याचे चित्र आहे. याबाबत आरोग्य यंत्रणेकडून स्पष्टीकरण मात्र, दिले जात नाही.
सद्यस्थितीत जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरिया आजाराचे संशयित रुग्ण नसल्याने रक्त तपासण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे रुग्ण समोर आलेले नाहीत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू असतानाही ग्रामीण भागात सर्वेक्षण सुरू आहे. याशिवाय शक्य त्या माध्यमातून डेंग्यू आणि मलेरियाची जनजागृती सुरू आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पावसाळ्यात साथरोगांचा होणारा फैलाव लक्षात घेता शहरी भागासह ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालये, नगरपालिकेच्या रुग्णालयांना डेंग्यू व मलेरिया आजाराबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अर्चना पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
गेल्या वर्षीची जून-जुलैची स्थिती -
जून : ग्रामीण भाग एकही रुग्ण नाही, शहरी भागात १ रुग्ण
जुलै : ग्रामीण भाग एकही रुग्ण नाही, शहरी भागात एकही रुग्ण नाही
गेल्या वर्षभराची एकत्रित स्थिती-
शहरी भाग : २९० जणांची रक्त तपासणी, १२९ रुग्णांना डेंग्यूची लागण
ग्रामीण भाग : ५६४ जणांची रक्त तपासणी, १९४ रुग्णांना डेंग्यूची लागण
यावर्षीची एकत्रित स्थिती -
शहरी भाग : ११ जणांची रक्त तपासणी, २ रुग्णांना डेंग्यूची लागण
ग्रामीण भाग : ७६ जणांची रक्त तपासणी, २४ रुग्णांना डेंग्यूची लागण