जळगाव - जिल्ह्यातील धरणगाव शहरात असलेल्या मरिमातेच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील मूर्तीचा चांदीचा मुकुट तसेच दानपेटीतील रोकड लांबवली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून दानपेटी होती बंद
धरणगाव शहरात सोनवद रस्त्यावर मरिमातेचे मंदिर आहे. या मंदिरात शनिवारी मध्यरात्रीनंतर ही चोरीची घटना घडली आहे. अज्ञात दोन चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून मरिमातेचा चांदीचा मुकुट तसेच दानपेटीतील रोख रक्कम चोरून नेली. चांदीचा मुकुट काढल्यानंतर चोरट्यांनी मंदिराची दानपेटी काढून मंदिराच्या मागच्या बाजूला नेली. त्याठिकाणी दानपेटी फोडून त्यातील रोकड लांबवली. दानपेटीत हजारो रुपयांची रक्कम होती. गेल्या अनेक दिवसांपासून दानपेटी उघडलेली नव्हती, त्यामुळे नेमकी किती रक्कम चोरीस गेली आहे, याची माहिती मिळाली नाही.
भरवस्तीत घडली घटना
शहरातील सोनवद रस्त्यावर असलेले मरिमातेचे मंदिर हे भरवस्तीत आहे. असे असताना याठिकाणी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांकडून रात्रीची गस्त होत नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
चोरी करणारे दोन्ही चोरटे हे 25 ते 26 वयोगटातील आहेत. मंदिरात चोरी करत असताना दोन्ही चोरटे मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांनी दिली. त्यानंतर सकाळी 9 वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. चोरट्यांचा शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली.