जळगाव - पालक आणि पाल्य यांच्यातील प्रेम भावनेला तडा देणारी एक अत्यंत क्रूर घटना जळगावात घडली. अपशकुनी असल्याचा समज करून घेत एका अल्पवयीन मुलीचा तिचे आई-वडील जन्मापासून अनन्वित छळ करत होते. या निर्दयी आई-वडिलांनी मुलीला अन्न व पाणी दिले नाही. तिला आंघोळ न करू दिल्याने शारीरिक व्याधी जडल्याने या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मन हेलावून टाकणारी ही घटना जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा हुडको भागात घडली आहे. या घटनेप्रकरणी त्या निर्दयी माता-पित्यावर बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कनीज फातेमा शेख जावीद अख्तर (वय 11) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी वडील जावीद अख्तर आणि आई नाजीया परवीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.
काय आहे प्रकरण?
जावीद अख्तर हा व्यवसायाने केमिस्ट आहे. त्याचा एक भाऊ डॉक्टर तर दुसरा वकील आहे. कनीजचा जन्म झाला, त्यावेळी तिच्या आजीचे निधन झाले होते. त्यानंतर 2 वर्षांनी जावीदच्या मेडिकल दुकानाला आग लागली होती. या दोन्ही घटनांमुळे कनीज ही अपशकुनी असल्याचा समज जावीदने केला होता. तेव्हापासून तिला डांबून ठेवणे, जेवण न देणे, मारहाण करणे अशा प्रकारे तिचा छळ सुरू होता. तिची अवस्था बघवली जात नसल्याने तिच्या आजी-आजोबांनी तिला आजोळी अमळनेर येथे आणले होते. याठिकाणी ती 2 ते 3 वर्षे राहिली. नंतर भेटण्याच्या बहाण्याने तिला आई-वडिलांनी परत घरी आणले होते. सध्या ती जळगावात पिंप्राळा-हुडकोत आई-वडिलांकडे राहत होती.
चार दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू, परस्पर केला दफनविधी -
4 दिवसांपूर्वी कनीजचा पहाटे संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या वडील, दोन्ही भावांनी परिसरातील काही लोकांच्या उपस्थितीत तिचा दफनविधी केला. दरम्यान, मुलीचे निधन झाल्यानंतर तिचे कुटुंबीय जळगाव सोडून बाहेरगावी गेले. ही बाब शेजाऱ्यांना खटकली. त्यांनी मुलीच्या आजोळच्या लोकांना घटनेची माहिती दिली. तेव्हा तिचे आजी-आजोबा व मामा जळगावात आले. यानंतर मामाने तिचा घातपात झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली.
मामाच्या तक्रारीनंतर हलली सूत्रे -
हे प्रकरण संशयास्पद असल्याने पोलिसांनी नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत कनीजचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले. त्यात तिचा मृत्यू पोटात अन्न व पाणी नसल्याने म्हणजेच कुपोषणाने झाल्याचे स्पष्ट झाले. तिला आंघोळ करू दिली नव्हती. म्हणून तिच्या डोक्यात उवा झाल्या होत्या. अंगात त्राण नसल्याने ती कृश झाली होती. त्यामुळे तिच्या पायाची कातडी अक्षरशः सोलली गेली होती. अनन्वित छळ झाल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याने या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा