जळगाव- माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाचे बनावट धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) तयार केल्याचे प्रकरण फारच चर्चेत होते. या प्रकरणी आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अन्य याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहे, अशी माहिती आज एकनाथ खडसेंच्या वतीने त्यांचे जळगावातील समर्थक दिपक फालक यांनी माध्यमांना दिली आहे.
यासंदर्भात दिपक फालक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच शिवसेनेचे जळगावातील माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाने चोपडा अर्बन बँक आणि अॅक्सिस बँकेचे 9.5 कोटी आणि 10 लाख रुपयांचे बनावट धनाकर्ष तयार केले होते. त्या आधारे दोघांनी डिसेंबर 2016 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात खडसेंविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार खडसे यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्यात खडसेंनी बाजू मांडल्यानंतर सदरील धनाकर्ष हे बनावट असल्याचे निदर्शनास आले होते. नंतर खडसे यांनी अंजली दमानिया, गजानन मालपुरेंसह अन्य याचिकाकर्त्यांविरुद्ध संगनमत करुन बनावट डी.डी. तयार करणे, फसवणूक करणे, खोटे आरोप करणे अशा अनेक कलमानुसार १३ जून २०१८ रोजी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना अंजली दमानिया व इतरांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सदरील गुन्हा रद्द करण्याबाबत याचिका दाखल केलेली होती. त्यावर खंडपीठाने गुन्हा रद्द करण्याचे आदेश पारीत केले होते. खंडपीठाच्या निर्णयानंतर खडसे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तीवादानंतर सदरील प्रकरणात तथ्य आढळून आल्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कौल व न्यायमूर्ती के. एन. जोसेफ यांनी अंजली दमानिया, गजानन मालपुरे यांच्यासह अन्य याचिकाकर्त्यांना नोटीस बजावली आहे, अशी माहिती दीपक फालक यांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात अंजली दमानिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, अद्याप मला न्यायालयाची कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही. परंतु, खडसेंनी जर सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी आव्हान दिले असेल, तर त्यांना तेथेही दिलासा मिळणार नाही. कारण हे प्रकरण खोटे नाहीच, अशी प्रतिक्रिया दमानिया यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.