जळगाव- शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जळगाव महापालिका कार्यक्षेत्रात 3 दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. काल (गुरुवारी) रात्री ८ वाजेपासून जनता कर्फ्यूला सुरुवात झाली. त्यानंतर आज (शुक्रवारी) पहिल्या दिवशी जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील बाजारपेठेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापना सोडल्या तर इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
१२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू
जळगावात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. १५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेत दवाखाने व मेडिकल्स, शासकीय कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह, दूध विक्री केंद्र तसेच कृषी क्षेत्रातील आस्थापना, गॅरेज अशा बाबींना या जनता कर्फ्यूत सूट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या बाबींना प्रशासनाकडून सूट नसून कडक निर्बंध आहेत.
किराणा, भाजीपाला व फळे विक्रीवरही निर्बंध
जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेतून किराणा माल, भाजीपाला व फळे विक्रीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. नागरिकांची बाजारपेठेत होणारी गर्दी रोखून कोरोनाची संपर्क साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जनता कर्फ्यूच्या अनुषंगाने प्रशासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू
जनता कर्फ्यूची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरात पेट्रोलिंग सुरू आहे. ठिकठिकाणी फिक्स पॉईंट उभारण्यात आले आहेत. मुख्य चौकांमध्ये तपासणी सुरू आहे. पेट्रोलिंग दरम्यान, विनाकारण पायी फिरणारे नागरिक आढळून आले, तर त्यांना समज देऊन घरी पाठवण्यात येत आहे. दुसरीकडे महापालिकेची सहा पथकेदेखील जनता कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी तैनात करण्यात आली आहेत.