जळगाव - गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या बाजारात असलेल्या अस्थिरतेचा परिणाम अजूनही कायम आहे. मंगळवारी (२२ सप्टेंबर) एकाच दिवसात चांदीच्या भावात सहा हजार रुपये, तर सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे चांदी ६८ हजार रुपयांवरून थेट ६२ हजार रुपये प्रतिकिलोवर (जीएसटीसह) तर सोने ५१ हजार ९०० रुपयांवरून ५१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर (जीएसटीसह) आले.
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होत आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीत भारतासह अमेरिका, रशिया, चीन अशा देशातील बडे गुंतवणूकदार कोणत्याही प्रकारची जोखीम नको म्हणून ‘एक्सचेंज ट्रेडेड फंड’ (इटीएफ) मध्ये मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करत आहेत. त्यामुळे आपल्याकडे सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत.
हेही वाचा - 'उपसभापतींचे चुकलेच', शरद पवारांचे मत; निलंबित खासदारांच्या समर्थनार्थ करणार लाक्षणिक अन्नत्याग
सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करून सोने आणि चांदी खरेदीला प्राधान्य देत आहेत. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी खरेदी-विक्रीवर सट्टा लावला जात आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंचे दर अस्थिर आहेत. परंतु, अशी परिस्थिती असताना मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदारांनी सोने व चांदी विक्रीला पसंती दिल्याने या दोन्ही धातूंचे दर घसरण्यास सुरुवात झाली. एकाच दिवसात सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली.
सोने व चांदीच्या घसरलेल्या दरांबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या खूप अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी गुंतवणूकदारांनी सोने-चांदीची विक्री सुरू केली. त्यामुळे सोने-चांदीचे दर घसरले. आता यापुढे नेमकी काय परिस्थिती राहील, हे अनिश्चितच आहे. यापुढे सोने व चांदीचे दर अजून घसरतील, अशी शक्यता देखील लुंकड यांनी व्यक्त केली.