मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली. यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट ही काही राजकारणातील मोठी उलथापालथ करणारी घटना आहे, असे मला वाटत नाही. या भेटीचा संदर्भ देशाच्या राजकारणाशी जोडू नये, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
प्रशांत किशोर हे कुठल्या राजकीय पक्षाचे नेते नाहीत. त्यांचे काम वेगळ्या प्रकारचे असते. त्यांना आम्ही सुद्धा अनेकदा भेटलो आहोत. उद्धव ठाकरे पण भेटले आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांनी आमच्यासाठी तसेच काँग्रेससाठी पण काम केले आहे. ते एक प्रोफेशनल पॉलिटिकल स्टॅटिजिस्ट आहेत. जर एखाद्या पक्षाचे प्रमुख नेते त्यांना भेटून चर्चा करत असतील तर त्यांनी त्यांच्या पक्ष कार्याविषयी, विस्ताराविषयी चर्चा केली असेल. प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट ही काही राजकारणातील मोठी उलथापालथ करणारी घटना आहे, असे मला वाटत नाही. या भेटीचा संदर्भ देशाच्या राजकारणाशी जोडू नये, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.
पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी दुपारी त्यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राऊत यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर मते मांडली. पत्रकार परिषदेला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगावचे संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, महापौर जयश्री सोनवणे उपस्थित होते.
मुंबई, कोकणनंतर जळगाव जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत-उत्तर महाराष्ट्राचा हा दौरा संघटनात्मक बांधणीसाठी आहे. राज्यातील सरकार किंवा सत्ता हे एका बाजूला आहे. ते राज्याच्या विकासाचे व प्रशासनाचे काम करत आहेत. शेवटी ज्या संघटनेमुळे ही सत्ता आहे, त्या संघटनेला, शिवसैनिकांना बळ देण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी हा दौरा आहे. कोविडमुळे कार्यकर्त्यांचे चेहरे पाहता आले नव्हते. या दौऱ्यात आज कार्यकर्त्यांना भेटता आले. त्यांना उद्धव ठाकरेंचा संदेश देता आला. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अत्यंत सक्रिय आणि मजबूत आहे. मुंबई व कोकणनंतर जळगाव जिल्ह्याने शिवसेनेला सर्वाधिक आमदार देण्याचे काम केले आहे. त्याबद्दल या जिल्ह्याविषयी कृतज्ञता आहे. जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचा राज्यातील राजकारणावर पडसाद उमटत असतात, असेही संजय राऊत म्हणाले.
राऊतांनी दिले स्वबळाचे संकेत-
स्वबळ म्हणजे काय असते, ते मला माहिती नाही. पण जिल्ह्यात शिवसेनेचे बळ नक्कीच आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने निवडणुका लढण्याची तयारी आणि मानसिकता आमच्या सर्व प्रमुख लोकांची आहे. निवडणूक महापालिकेची असेल, जिल्हा परिषदेची असेल, विधानसभेचीच काय लोकसभेची जरी असेल तरी ती आम्ही स्वबळावर लढू आणि जिंकू, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेने जिल्ह्यात आमदार दिले, महापौर दिले. आता आपण खासदार देऊ, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांच्या भावना मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवणार आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले.
देशातील प्रादेशिक आणि विरोधी पक्षांनी एकत्र यावे -
प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये झालेल्या भेटीनंतर देशपातळीवरील आघाडी संदर्भात सुरू असलेल्या चर्चेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसच्या आघाडीमध्ये किती पक्ष उरले आहेत, ते एकदा पाहावे लागणार आहे. या देशातील जे प्रादेशिक आणि विरोधी पक्ष आहेत, त्यांनी एकत्र येऊन एक मजबूत आघाडी उभे करणे गरजेचे, असे राऊत म्हणाले.
काँग्रेस देशातला प्रमुख पक्ष -
विरोधी पक्षांची आघाडी ही काँग्रेस शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण काँग्रेस जरी कमजोर झाली असली तरी तो देशातला एक प्रमुख विरोधी पक्ष आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाम अशा राज्यांमध्ये अजूनही काँग्रेसचे चांगले बळ आहे. यासंदर्भात देशातील प्रमुख नेते चाचपणी करत असतील तर नक्कीच त्यातून भविष्यात दृश्य फळ बघायला मिळेल, असेही संजय राऊत म्हणाले.
बंगाल राजकारणावर प्रतिक्रिया...
पश्चिम बंगालमधील मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसचे संस्थापक होते. ते भाजपात गेल्याने भाजपला मोठा फायदा झाला होता, असे मला वाटत नाही. आता ते परत ममता दीदींकडे आले असतील तर त्यांचे आम्ही स्वागत करतो, असेही राऊत म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न-
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या आंदोलनाला एक दिशा मिळावी, त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे साकडे घातले आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आवश्यक असलेली घटनादुरुस्ती करायची आहे. त्याला शिवसेना पाठींबा देईल. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा - पवारांच्या भेटीनंतर प्रशांत किशोर यांनी गाठला शाहरुखचा 'मन्नत' बंगला, चर्चांना उधाण!