जळगाव - जिल्ह्यात सोमवारपासून म्हणजेच २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडणार आहेत. परंतु, पालकांची संमती असेल त्याच विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारची सक्ती शिक्षण विभागाकडून करण्यात येणार नाही. आगामी काळात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर शाळा बंद ठेवण्यात येतील, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. त्यात नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांचा समावेश आहे. याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील शाळा देखील सोमवारपासून उघडणार आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन, यापूर्वी जिल्ह्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू होत्या. मात्र, आता शाळा प्रत्यक्ष सुरू होणार असल्याने ज्या पालकांची आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची इच्छा आहे; त्यांनाच शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही हे पालकांनी ठरवायचे आहे.
हेही वाचा -नागपुरात ९ ते १२ वी पर्यतची शाळा २३ नोव्हेंबरपासून होणार सुरू, शिक्षकांच्या कोरोना चाचणीना सुरुवात
शाळांना अशी आखून दिली आहे नियमावली-
जे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत त्यांचे हमीपत्र पाहूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा, एका वर्गात 60 विद्यार्थी असतील तर एका बाकावर एक विद्यार्थी असे 30 विद्यार्थी वर्गात बसवायचे आहेत. ग्रामीण भागात ऑक्सिमीटर आणि थर्मलगन ग्रामपंचायतींनी पुरवाव्यात, असे शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकारी यांना सांगण्यात आले आहे. शाळा भरण्यापूर्वी खोल्या, बेंच यांचे नियमित निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे तसेच बाधितांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच शाळेत प्रवेश देण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांची लेखी संमती घेणे आवश्यक आहे. विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांच्या अध्यापनावर सर्वाधिक भर दिला जावा. केवळ चारच तासिका दिवसभरात घ्याव्यात. एका वर्गात विद्यार्थी संख्या जास्त असेल तर आज निम्मे आणि उद्या निम्मे असे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे नियोजन करावे. एका बाकावर एकच विद्यार्थी असावा, विद्यार्थी संख्या जास्त संख्या असेल तर दिवसाआड वर्ग घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.
शाळांकडून पूर्वतयारी जोरात-
जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून उघडणार असल्याने शाळांकडून पूर्व तयारी जोरात सुरू आहे. शनिवारी जळगावातील बहुतांश शाळांमध्ये वर्गखोल्या, बेंचेस त्याचप्रमाणे शाळेचा परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये, या अनुषंगाने आवश्यक त्या आरोग्यविषयक उपाययोजना शाळांमध्ये केल्या जात होत्या. दरम्यान, शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शाळा उघडण्यापूर्वी प्रत्येक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
हेही वाचा - शाळा सुरू करायचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण