जळगाव - राज्य परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आक्रमक होत जळगाव तालुक्यातील विविध गावांमधील शाळकरी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी शहर बसस्थानकात आंदोलन केले. बसेस वेळेवर न सुटणे, गावाच्या थांब्यांवर बसेस उभ्या न करणे, अशा कारणांनी कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी आगाराच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत सुमारे अर्धा ते पाऊण तास बसेस रोखून धरल्या. अखेर, एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुरळीत सेवेचे आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
जळगाव तालुक्यातील गिरणा नदी पट्ट्यातील आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, कानळदा तसेच भोकर या गावांमधील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी जळगावात येत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एस. टी. महामंडळाच्या वतीने या गावांच्या मार्गावर सोडण्यात येणाऱ्या बसेसचे वेळापत्रक कोलमडले आहे. बसेस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहचता येत नाही. त्यामुळे तासिका बुडतात. शाळेत उशिरा आल्याने शिक्षक दंड आकारतात. प्रसंगी शिक्षाही करतात. एवढेच नव्हे तर या मार्गावरील बस फेऱ्या देखील कमी केल्याने बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे चालक-वाहक अनेक गावांच्या थांब्यांवर बस थांबवत नाहीत.
हेही वाचा - टोलनाका आंदोलनप्रकरणी शिवेंद्रराजेंसह 80 जणांवर गुन्हा
अनेकदा बस न मिळाल्याने विद्यार्थ्यांना खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अशा वेळी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. या साऱ्या कारणांनी कंटाळलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आधीच नाराजी होती. त्यातच शुक्रवारी सायंकाळी जळगाव आगारातून आव्हाणे ते भोकर मार्गावरील बस वेळेवर सुटली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनी आगारातील अधिकाऱ्यांकडे आपल्या समस्या मांडल्या. मात्र, अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. अखेर सर्व विद्यार्थ्यांनी आगाराच्या दोन्ही प्रवेशद्वारांसमोर एकत्र येत बसेस बाहेर जाऊ देण्यास नकार दिला. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा - जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चार दोषींना फाशीची शिक्षा
ही परिस्थिती पाहून एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांजवळ धाव घेतली. पोलीस देखील त्याठिकाणी आले. पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.