जळगाव - केंद्र सरकारने संसदेत पारित केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्याविरोधात शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्यावतीने कृषी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून काँग्रेसतर्फे आज किसान अधिकार दिवस पाळला जात आहे. केंद्रातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध असलेली तीन कृषी विधेयके मंजूर केली आहेत. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने हा दिवस सत्याग्रह म्हणून पाळला जात आहे. या नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. शेतकरी रस्त्यावर येऊन व्यापारीवर्गाच्या अधिकारात वाढ होणार आहे, असा काँग्रेसचा आरोप आहे. म्हणून ही विधेयके तत्काळ मागे घ्यावीत, या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने देशभरात आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनांचा एक भाग म्हणून आज किसान अधिकार दिवस पाळला जात आहे. जोपर्यंत केंद्र सरकार नवीन कृषी कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा संघर्ष चालू राहील. या कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असल्याने हा कायदा तात्काळ मागे घ्यावा, असे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी म्हटले आहे.