जळगाव - लोकसभा निवडणुकीत भाजपला कौल देणाऱ्या रावेर विधानसभा मतदारसंघातील यावेळची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. भाजपकडून विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांनाच पुन्हा संधी मिळणार असल्याचे जवळजवळ निश्चित आहे. तर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार शिरीष चौधरींना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, शिरीष चौधरींनी अपक्षच निवडणूक लढवावी, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे. दुसरीकडे भुसावळचे अनिल चौधरी हेदेखील अपक्ष म्हणून तयारी करत आहेत.
रावेर विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपकडे आहे. २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नसल्याचा फटका काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरींना बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गफ्फार मलिक यांनी ३१ हजार २७१ मते घेतली होती. त्यामुळे भाजपचे हरिभाऊ जावळे यांच्याकडून १० हजार मतांनी शिरीष चौधरींना पराभव स्वीकारावा लागला. यावेळी मात्र, दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्यास काँग्रेसचा उमेदवार भाजपला चांगली लढत देऊ शकतो. मागील काही वर्षांत काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांचे या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होते. त्यांच्या पश्चात या मतदारसंघावर भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रभाव निर्माण केला. जळगाव जिल्ह्यात भाजपचा बालेकिल्ला मजबूत झाल्यानंतर रावेरमध्येही काँग्रेसचा प्रभाव हळूहळू ओसरला.
मागील पाच वर्षांच्या काळात भाजपचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांनी विविध विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे प्रमुख राजकीय विरोधक असलेले शिरीष चौधरी यांना मात्र, पूर्वजांकडून मिळालेला राजकीय वारसा पुढे यशस्वीपणे चालवता आला नाही. परंतु, मतदारसंघात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात कमी पडलेले हरिभाऊ जावळेंच्या विरोधात असलेल्या जनक्षोभाचा लाभ उचलण्यात चौधरी काहीअंशी यशस्वी झाले आहेत. त्यामुळे भाजपचा प्रभाव कायम असला तरी जावळेंना यावेळी मैदान मारणे सोपे नाही. काँग्रेसचे पक्षसंघटन मजबूत नसल्याने शिरीष चौधरींनी अपक्ष उमेदवारी करावी, असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह आहे. आता चौधरी काय निर्णय घेतात? याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.
अल्पसंख्याक समाज ठरतो निर्णायक -
रावेर या मतदारसंघात मराठा, लेवा, मुस्लीम, बौद्ध मतदारांची संख्या जास्त आहे. त्यासोबत गुर्जर, धनगर, माळी, कोळी आदिवासी समाजही या ठिकाणी निर्णायक आहे. येथे लोकसभा व विधानसभेची समीकरणे नेहमीच वेगळी राहिली आहेत. लोकसभेत या मतदारसंघाने भाजपकडे कल दिल्याचा इतिहास आहे. खासदार रक्षा खडसे यांना रावेर विधानसभेतून ३९ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. मात्र, मागील निवडणुकीच्या तुलनेत हे मताधिक्य ८ हजारांनी घटले आहे. त्यामुळे आताची विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
हे असू शकतात संभाव्य उमेदवार -
भाजपकडून विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे, कुंदन फेगडे, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती सुरेश धनके हे इच्छुक आहेत. दुसरीकडे, काँग्रेसकडून माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष दारा मोहंमद तसेच वंचित बहुजन आघाडीतर्फे विवेक ठाकरे यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून हरिभाऊ जावळे यांची नुकतीच कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. त्यामुळे हरिभाऊ जावळेंची कॅबिनेट मंत्रिपदाची मनीषा पूर्ण झाली आहे. आता त्यांना बाजूला करून भाजप अन्य कोणाला उमेदवार म्हणूनही पुढे करू शकतो. जावळेंना पर्याय म्हणून उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. लोकसभेवेळी देखील पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली होती. पण एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाली होती. आता असेच घडते की जावळेंचा पत्ता कापला जातो? याची उत्सुकता आहे.
वंचितचा पत्ता चालणार का?
या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून विवेक ठाकरे हे इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात तब्बल ८० हजार मते मिळवली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचितचा पत्ता चालणार का? असा प्रश्न आहे. या मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाचे मतदान निर्णायक आहे. हे मतदान जर वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने झुकले तर निकाल बदलू शकतो. अन्यथा वंचितच्या उमेदवारामुळे होणारे मतांचे विभाजन हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घातक ठरू शकते. वंचितची उमेदवारी ही भाजपच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडेल. दुसरीकडे, मूळचे भुसावळचे असलेले अनिल चौधरी यांनी देखील रावेरात चाचपणी सुरू केली आहे. परंतु, त्यांना मतदार कितपत साथ देतात, हे सांगणे कठीण आहे.
मेगा रिचार्ज व केळी उद्योग कधी?
या मतदारसंघात मेगा रिचार्ज प्रकल्प, केळीवर आधारित प्रकल्पांची निर्मिती, बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्ग, रावेर व यावल येथे एमआयडीसीची उभारणी, रावेरचे क्रीडा संकुल पूर्ण करणे, उच्च शिक्षणाची व्यवस्था, शेती रस्ते मजबुतीकरण, २००६ च्या अतिवृष्टीत वाहून गेलेल्या दुर्लक्षित पाझर तलावांची बांधणी व दुरुस्ती, महिला बचत गटांसाठी लघुउद्योग आणि इतर विषय महत्त्वाचे आहेत.
असा आहे रावेर मतदारसंघ -
एकूण मतदार : २ लाख ९५ हजार ८४१
पुरुष मतदार : १ लाख ५३ हजार ८४१
महिला मतदार : १ लाख ४१ हजार ८६६
२०१४ विधानसभेतील गणितं -
हरिभाऊ जावळे : (भाजप) ६५ हजार ९२२ मते
शिरीष चौधरी : (काँग्रेस) ५५ हजार ९२२ मते
गफ्फार मलिक : (राष्ट्रवादी) ३१ हजार २७१ मते
प्रल्हाद महाजन : (शिवसेना) १४ हजार ९२८
२०१९ लोकसभेतील मताधिक्य -
भाजप : १ लाख ८ हजार ००८
काँग्रेस : ६८ हजार ६७८