जळगाव - जिल्ह्यातील जामनेर येथे भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा काल (मंगळवारी) दुपारी पार पडला. या सोहळ्यापूर्वी अज्ञात व्यक्तीने गिरीश महाजन यांच्या स्वीय सहायकांच्या मोबाईलवर फोन करत एक कोटी रुपयांची खंडणी मागत हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी रात्री उशिरा जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 71 लाख 75 हजार पार
ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल्सच्या लोकार्पण सोहळ्याची धावपळ सुरू असतानाच धमकीचा फोन आल्याने कार्यक्रमस्थळी प्रचंड खळबळ उडाली होती. या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येणार होते. अशातच हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी आल्यामुळे पोलीस यंत्रणेची त्रेधा उडाली होती. लोकार्पण सोहळ्याची धावपळ सुरू असताना गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्या मोबाईलवर दुपारी साधारण एक वाजेच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. त्याने हिंदी भाषेमध्ये 'गिरीश महाजन को बोल दे, एक करोड भेज दे, नही तो हम हॉस्पिटल बॉम्ब से उडा देंगे'. एवढे बोलून समोरच्या व्यक्तीने फोन कट केला. त्यानंतर पुन्हा थोड्या वेळात म्हणजेच 3 वाजून 37 मिनिटांनी तायडे यांच्या मोबाईलवर एक संदेश केला. या संदेशमध्येही हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. '5 बजे तक 1 करोड भेज दे, महाजनको बोल दे, नही तो बहोत बडा ब्लास्ट हो जायेगा, मालेगाव मे मेरे आदमी खडे है, नही तो तुम्हारी मर्जी, मैं मेरा काम कर के निकल जाऊंगा', अशा आशयाचा तो संदेश होता. या प्रकारानंतर दीपक तायडे यांनी कार्यक्रमस्थळी बंदोबस्तावर असलेले सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांना माहिती दिली. नंतर पोलिसांनी कार्यक्रमस्थळी कसून चौकशी केली.
यानंतर याप्रकरणी जामनेर पोलिसात दीपक तायडे यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप नाईक करत आहेत.