जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्नुषा भाजपा खासदार रक्षा खडसेंनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने, आता तरी महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांसाठी कसं काम करावं लागतं हे कळेल, असा टोला रक्षा खडसे यांनी लगावला आहे.
खासदार रक्षा खडसे शनिवारी दुपारी जळगावमध्ये आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, केळी पीक विम्याचा मुद्दा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या मुद्द्यावर राजकारण होऊ शकत नाही. जळगाव जिल्ह्यातील सुमारे 50 हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांशी निगडित हा मुद्दा आहे. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले म्हणून आम्ही केळी पीक विम्यासाठी आंदोलन करत आहोत, असे नाही. उलट या मुद्द्याचा पाठपुरावा करताना आम्हाला ते मदत करतील. ते जे बोलतील, ते शेतकऱ्यांच्या बाजूनेच बोलतील. कारण त्यांचा या गोष्टींमध्ये चांगला अभ्यास आहे. राज्यात भाजपचे सरकार होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व खडसे कृषी मंत्री होते, तेव्हा केळी पीक विम्याचे निकष शेतकऱ्यांच्या हिताचे केले गेले होते, असे त्या म्हणाल्या.
राज्य सरकारकडून विम्याच्या वाटपामध्ये राजकारण
यावेळी केळी पीक विम्याच्या मुद्द्यावरून खासदार रक्षा खडसेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्य सरकार आणि प्रशासनातील अधिकारी हे पीक विमा कंपन्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल? या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. पीक विम्याचे निकष ठरवताना जो घोळ झाला आहे, तो राज्य सरकारने जाणीवपूर्वक केला आहे. काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पीक विम्याचे निकष आधीप्रमाणे ठेवावेत, अशी अधिकाऱ्यांची इच्छा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना आणली. पण राज्य सरकार काहीतरी राजकारण करता यावे, केंद्र सरकारवर आरोप करता यावेत म्हणून शेतकऱ्यांसोबत खेळ खेळत आहे. हे अतिशय चुकीचे आहे. राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. असेही त्या यावेळी म्हणाल्या.