जळगाव - यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबलेल्या पावसाचा फटका रब्बी हंगामाला बसला आहे. डिसेंबर सुरू झाला तरी जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी फक्त 13 टक्के पेरण्या झाल्या आहेत. कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रावर ज्वारी, हरभरा आणि गहू या पिकांची पेरणी सुरू आहे. खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर आहे.
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी साडेसात लाख हेक्टर क्षेत्रापैकी दीड ते पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी होते. खरीप हंगामातील ज्वारी, उडीद, मूग, भुईमूग या पिकांची काढणी झाल्यानंतर रिकामे झालेल्या शेतांमध्ये ज्वारी, हरभरा, गहू या पिकांची पेरणी होते. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकरी पेरणी करतात.
हेही वाचा - मांजरीने भ्रूण खाल्ले, केईएम प्रशासनाचे खात्यांतर्गत चौकशीचे आदेश
मात्र, यावर्षी पाऊस लांबल्याने शेतांमध्ये वाफसा नव्हता. त्यामुळे रब्बी हंगामासाठी मशागत करता आली नाही. तब्बल एक ते दीड महिना उशिराने शेतकरी ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी होत आहेत. डिसेंबर महिन्याला सुरुवात होऊनही फक्त 13 टक्के म्हणजेच अवघ्या 20 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. थंडीचा जोर अजूनही वाढत नसल्याने रब्बी हंगामातील गहू पेरणीला हवा तसा वेग आलेला नाही.
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात वाया गेला मात्र, त्यामुळे पाण्याची उपलब्धता झाली आहे. नद्या, नाले आणि विहिरींना पाणी असल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामासाठी होणार आहे. पाणी उपलब्ध असल्याने यावर्षी जळगाव जिल्ह्यात रब्बी ज्वारीसह कांद्याचेही क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. पुढच्या काळात गिरणा, तापी, वाघूर नदी प्रदेशात टरबूज आणि खरबूज लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होईल, असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांना आहे.
यावर्षी कापूस पिकावर काही प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची फरदड (कापसाचा उशिरा निघणारा माल) घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.