जळगाव - दुष्काळाने पिचलेल्या एका शेतकऱ्याने पाण्यासाठी शेततळे खोदले. त्यानंतर पहिल्याच वर्षी चांगला पाऊस झाला. पाण्याने काठोकाठ भरलेल्या शेततळ्याचा उपयोग शेतीसह मत्स्यपालनासाठी होऊ शकतो, या विचारातून त्याने पाऊल टाकले. याच काळात बारामतीतील एका शेतकऱ्याने राबवलेल्या प्रयोगापासून प्रेरणा घेत त्याने शेततळ्यातील मत्स्यपालनाला कुक्कुटपालनाची जोड दिली. विशेष म्हणजे, शेततळ्यात तरंगते पोल्ट्री फार्म उभारून मत्स्यांच्या खाद्याची उपलब्धता केली. शांताराम काळे या शेतकऱ्याने हा अभिनव प्रयोग आपल्या शेतातील शेत तळ्यात केला आहे. काळेंनी उभारलेले शेततळ्यातील तरंगते पोल्ट्री फार्म सर्वत्र कुतूहलाचा विषय ठरला आहे.
हेही वाचा - गुलाबरावांनी मुलासारखं वागायला हवं होतं; खडसेंचे पाटील यांना प्रत्युत्तर
शांताराम काळे हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. शेतीचा बहुतांश भाग कोरडवाहू आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात सातत्याने दुष्काळ पडत होता. त्यामुळे शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने काळे हतबल झाले होते. दरम्यानच्या काळात गावातील सहकारी शेतकरी मित्रांकडून त्यांना कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या 'मागेल त्याला शेततळे' योजनेची माहिती मिळाली. म्हणून त्यांनी आपल्या शेतात शेततळे खोदण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागाकडून शेततळ्यासाठी संमती मिळाल्यानंतर त्यांनी उमर्दे शिवारातील शेतात एकरभर क्षेत्रात 200 फूट लांब आणि 100 फूट रुंद आकाराचे शेततळे उभारले. या कामी त्यांना सुमारे 5 लाख रुपये खर्च आला.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार; गिरीश महाजनांचा सरकारला इशारा
सुदैवाने त्याच वर्षी चांगला पाऊस झाल्याने शेततळे भरले. काहीतरी नवीन करण्याची इच्छा असल्याने त्यांनी शेततळ्याच्या माध्यमातून शेतीला जोडधंदा करायचा ठरवले. म्हणून ते मत्स्यपालनाच्या व्यवसायाकडे वळाले. मत्स्यपालनाविषयी अधिकची माहिती घेऊन त्यांनी 1 हजार मत्स्य बीजे आणून शेततळ्यात सोडली. या व्यवसायातून त्यांना वर्षाकाठी सुमारे 2 लाख रुपये अधिकचा नफा अपेक्षित आहे.
बारामतीच्या शेतकऱ्याकडून मिळाली प्रेरणा
शांताराम काळेंना शेतातील नवनवे प्रयोग पाहण्याची आवड आहे. त्यामुळे ते अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांकडे जाऊन माहिती घेत असतात. शेती अभ्यास दौऱ्यासाठी ते एकदा बारामतीला गेले होते. त्याठिकाणी एका शेतकऱ्याने शेततळ्यात मत्स्यव्यवसाय सुरू केला होता. तसेच एक छोटासा तरंगता पोल्ट्री फार्म देखील उभारला होता. हा पोल्ट्री फार्म उभारण्याचा उद्देश म्हणजे मत्स्य बिजांचा खाद्याचा खर्च वाचवणे असा होता. कोंबड्यांची विष्ठा मत्स्य बीजे खातात. यातून दुहेरी फायदा त्या शेतकऱ्याने साधला होता. हा प्रयोग पाहून शांताराम काळेंनी आपल्या शेततळ्यात असाच पोल्ट्री फार्म उभारण्याचा निर्णय घेतला.
शेततळ्याचा वापर फक्त शेतीसाठी न करता त्यांना त्यापासून अधिक उत्पन्न कसे मिळेल, यासंदर्भात विचार सुरु केला. या शेततळ्यात त्यांनी कुक्कुटपालनासाठी बंदिस्त प्लास्टिक टाक्यांच्या सहाय्याने पाण्यावर तरंगते पत्र्याचे शेड तयार केले. 40 बाय 30 फुट आकाराच्या शेडसाठी त्यांना सुमारे 45 हजार रुपये खर्च आला. शेडच्या तळाशी तारेची जाळी बसवली. जेणेकरून कोंबड्यांची विष्ठा पाण्यात पडावी. या शेडमध्ये देशी पाथर्डी जातीची कोंबड्यांची पिल्ले आणली. त्यांच्यासाठी सिमरन पोल्ट्री फीड नावाचे खाद्य टाकले. दर अडीच ते तीन महिन्यांनी 300 कोंबडीची पिल्ले ते शेडमध्ये टाकतात. पिल्ले तयार झाल्यानंतर ते विकतात. यापासून त्यांना 30 हजार रुपये मिळतात. दोन्ही व्यवसाय हळूहळू वाढविण्याचा काळेंचा विचार आहे. त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शोधलेला पर्याय कौतुकास्पद ठरला असून अनेक शेतकरी त्यांच्या शेतात भेटी देऊन पाहणी करत असतात.