जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात मंदीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या 15 दिवसात जिल्ह्यातील प्रदुषणाच्या स्तरात तब्बल २०० पटीने घट झाली आहे. नेहमी जिल्ह्याचा प्रदुषणाचा स्तर हा 260 ते 280 पॉइंट इतका असतो. मात्र, सद्यस्थितीत हाच स्तर 35 ते 100 पॉइंटवर आला आहे.
जळगाव जिल्ह्यात औद्यागिक क्षेत्र वाढतच आहे. यासह जंगलांचा होणारा ऱ्हास, यामुळे जिल्ह्यातील प्रदुषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे, जळगाव शहरात खराब झालेल्या रस्त्यांमुळे व जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे हवेत धुलिकणांचे प्रमाण वाढत जात आहे. वातावरणातील धुलिकणांचे 60 टक्के प्रमाण हे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही, एवढे समजले जाते. मात्र, जळगाव शहरातील धुलिकणांचे प्रमाण हे 72 पॉइंटवर गेले आहे. त्यामुळे जळगावकरांचे आरोग्य आधीच धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे धुलिकणांच्या स्तरात मोठी घट झाली आहे.
- कार्बन मोनोऑक्सार्ईडमध्ये घट, धोक्याची पातळी मात्र कायम -
लॉकडाऊनमुळे जळगाव शहरातील एमआयडीसीमधील अनेक उद्योग सध्या बंद आहेत. हीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही घातक ठरू शकतील, अशा वायूंमध्ये घट झाली आहे. वायू प्रदुषणात कार्बन मोनोऑक्साईड हा मुख्य घटक मानला जातो. लॉकडाऊनमुळे कार्बन मोनोऑक्सार्ईडच्या प्रमाणात काही अंशी घट झाली आहे. मात्र, सद्यस्थितीत कार्बन मोनोऑक्सार्ईडचे प्रमाण 330 पॉइंट इतके आहे. हे प्रमाण देखील मानवी आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच समजले जाते.
- सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईडच्या प्रमाणात मोठी घट-
वायू प्रदुषणाच्या दृष्टीने कार्बन मोनोऑक्सार्ईडनंतर सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड हे वायू घातक समजले जातात. सल्फर डायऑक्साईडच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. लॉकडाऊनमुळे कारखाने बंद आहेत. तसेच रस्त्यांवर देखील वाहनांची वर्दळ 80 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे हा परिणाम झाल्याची माहिती वेलनेस वेदरचे संचालक नीलेश गोरे यांनी दिली आहे. सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण हे नेहमी 5 पॉइंट इतके असते. मात्र, सद्यस्थितीत हे प्रमाण 3.98 इतके आहे. तर नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण 35 पॉइंटवरून 20 पॉइंटवर आले आहे.
- धुलिकणात झाली मोठी घट, आकाश झाले निरभ्र -
जळगाव शहरात धुलिकणांची मोठी समस्या आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे गेल्या 15 दिवसात धुलिकणांचे प्रमाण 40 पॉइंटवर आले आहे. जे प्रमाण नेहमी 72 पॉइंटवर असते. 22 मार्चला पाळण्यात आलेल्या जनता कर्फ्यू दरम्यान हे प्रमाण एकाच दिवशी 12 टक्क्यांनी कमी होवून 60 पॉइंटवर आले होते. आता 15 दिवसांच्या लॉकडाऊननंतर हे प्रमाण 40 पॉइंटवर आले आहे. धुलिकणांचे प्रमाण कमी झाल्यामुळे वातावरणात सुस्पष्टता पाहायला मिळत आहे. नेहमीपेक्षा आकाश अधिक निरभ्र दिसून येत असून, रात्रीच्यावेळेस चांदण्यांचे प्रमाण देखील आता जास्त दिसू लागले आहे. धुलिकणांसह ध्वनी प्रदुषणातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
औद्योगिक वसाहत देखील बंद असल्याने कंपन्यांमधून थेट तापी नदीत जाणारे रसायनयुक्त पाणीही सध्या नदीत जात नसल्याने जलप्रदुषण देखील कमी होत आहे.
- या घटकांचे कमी झाले प्रमाण-
- कार्बन मोनोऑक्सार्ईड : 355 ते 360 पॉइंटवरून 330 पॉइंट
- सल्फर डायऑक्साईड : 5 पॉइंटवरून 3.98 पॉइंट
- नायट्रोजन ऑक्साईड : 35 टक्क्यांवरून 20 टक्के
- धुलिकण : 72 पॉइंटवरून 40 पॉइंट
- एकूण प्रदुषणाचा स्तर - 22 मार्चपूर्वी - 260 ते 280 पॉइंट
- 22 मार्चनंतर - 35 ते 100 पॉइंट