जळगाव - लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार ए.टी पाटील यांचा पत्ता कापल्याने त्यांनी भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना विरोध करून वाघ यांची वाट बिकट केली आहे. सोबतच भाजपचे 'संकटमोचक' म्हणून राजकीय पटलावर उदयास आलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही संकटात टाकले आहे. यामुळे स्मिता वाघ यांच्या घोषित झालेल्या उमेदवारीबाबत अद्याप नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.
तिकडे मात्र, प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने भाजपच्या अंतर्गत गोटात मोठी कुजबुज सुरू आहे. गेल्यावेळी तब्बल ३ लाख ८३ हजार एवढ्या मताधिक्क्याने विजयी झालेले भाजप खासदार ए. टी पाटील यांचा या निवडणुकीत पक्षाने पत्ता कापला. भाजपने विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारीची संधी दिल्याने ए. टी. पाटील प्रचंड नाराज आहेत. जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना हाताशी धरून संकटमोचक गिरीश महाजन यांनी आपले तिकीट कापल्याचा आरोप खासदार पाटील यांनी केला. नाराज झालेल्या खासदार पाटील यांनी पारोळ्यात नुकताच समर्थकांचा मेळावा घेत वाघ यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात वेगळी चूल मांडून खासदार ए. टी पाटील पक्षविरोधी बंड करतील का? हा सध्या एकीकडे उत्सुकतेचा विषय आहे. मात्र, दुसरीकडे पाटील लवकरच भाजपच्या प्रचाराला लागतील, अशी खात्री खुद्द मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजप उमेदवाराला आहे.
भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाचा फायदा मात्र तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना होताना दिसत आहे. देवकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजपचा अजून प्रचार सुरू व्हायचा असताना राष्ट्रवादीचे उमेदवार देवकर यांनी अख्खा मतदारसंघ पालथा घातला आहे.
शिवसेनेचे काही पदाधिकारी गुलाबराव देवकर यांच्या बाजूने असल्याचीही जोरदार चर्चा आहे. असे असले तरी अजून निवडणुकीचे खरे वातावरण तापायचे बाकी आहे. तेव्हा कोण सोबत येते आणि कोण जाते, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.