जळगाव - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसातपासून मतदान सुरू झाले आहे. सर्वच केंद्रावर मतदारांचा चांगला उत्साह दिसून आला. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्यामध्ये ६८७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान सुरू असून, सर्व ठिकाणी शांततेत मतदान पार पडत असताना, असोदामध्ये मात्र पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची घटना घडली आहे. काही पॅनलचे उमेदवार मतदान केंद्रावर जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. यावर इतर पॅनलच्या उमेदवारांनी हरकत घेतली. पोलिसांनी उमेदवारांना सांगूनही ते मतदान केंद्राबाहेर जात नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
घटनास्थळी पोलीस अधीक्षकांची भेट
सकाळी साडेसातला मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले. साडेआठच्या सुमारास असोदा येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदार आले असता, काही उमेदवारांनी त्यांच्याशी संर्पक साधण्याचा प्रयत्न केला. यावर इतर उमेदवारांनी हरकत घेतली, व बंदी असतानाही मतदान केंद्राच्या परिसरात हे उमेदवार कसे फिरत आहेत? असा सवाल उपस्थित केला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करूनही दोन्हीकडेच उमेदवार ऐकत नसल्याने अखेर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. लाठीमारानंतर उमेदवार मतदान केंद्रातून बाहेर पडले. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे यांनी मतदान केंद्राला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.