जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरी भागात कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी या आदेशाचे उल्लंघन होताना दिसत आहे. जळगावमध्येही या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला.
जगभरासह देशातही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. राज्यातही ९० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कलम १४४ लागू केले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने, कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, जळगावात जमावबंदी आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून लाठ्यांचा प्रसाद दिला जात आहे.
जळगाव शहरात अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंसह इतर दुकाने उघडी आहेत. तर नागरिक देखील कोणत्याही ठोस कारणाविना घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. अनेक रस्त्यांवर तरुणांचे टोळके थांबून गप्पा करत आहेत. नागरिक देखील वाहनांवरून फिरताना आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांनी बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या तरुणांना लाठ्यांचा प्रसाद देत पिटाळून लावले.
बाजारपेठेतून व्यावसायिकांना हुसकावले
सोमवारी सकाळी 9 वाजेनंतर शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेले बळीराम पेठ, सुभाष चौकात काही हातगाडीधारकांनी वस्तू विक्रीसाठी गाड्या लावल्या होत्या. त्याठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे पाहून पोलिसांनी बाजारपेठेतून व्यावसायिकांना हुसकावून लावले. केवळ भाजीपाला विकणाऱ्या व्यावसायिकांना थांबू देण्यात आले. मात्र, त्यांनाही एकाच ठिकाणी न थांबता काही अंतरावर उभे राहण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या.
जळगाव शहरात फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, गांधी मार्केट, भास्कर मार्केट, गोदडीवाला मार्केट ही प्रमुख व्यापारी संकुले आहेत. मात्र, राज्य सरकारने जमावबंदी आदेश लागू करत केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडे ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मेडिकल, दूध डेअरी, किराणा सामुग्रीची दुकाने उघडी होती. इतर सर्व मार्केटमधील दुकानांचे शटर डाऊन होते.