जळगाव - संचारबंदीच्या काळात रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीचा डब्बा फोडून सुमारे २०० पोती नागरिकांनी लांबवल्याची घटना गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. सुमारे ५० पेक्षा जास्त तरुणांनी ही रेल्वे लुटल्याची घटना घडली. या तरुणांनी अंधाराचा फायदा घेत दगडफेक देखील केली. गुरुवारी रात्री ९.३० पर्यंत हा प्रकार सुरू होता.
संचारबंदी असली तरीदेखील किराणा दुकानांसह जीवनावश्यक वस्तुंची सर्व दुकाने सुरू ठेवण्याचे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. तरी देखील नागरिकांमध्ये जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी झुंबड उडत आहे. अशातच गुरुवारी रात्री ८.३० वाजता रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका मालकाडीचा डब्बा फोडून त्यातून धान्याची पोती पळवल्याचा खळबळजनक प्रकार जळगावात घडला.
बऱ्याच वेळापासून उभ्या असलेल्या मालगाडीतचा डब्बा काही टवाळखोर तरुणांनी फोडला. या डब्यात धान्याची पोती असल्याचे समजताच अनेकांनी पोती बाहेर काढून फलाटावर फेकली. रेल्वे पुढे निघाल्यानंतर ही पोती घेऊन पळ काढण्यास सुरुवात केली. पाहता-पाहता अवघ्या पाऊन तासात सुमारे २०० पोती नागरिकांनी काढुन घेतली. हा प्रकार लक्षात येताच लोको पायलटने रेल्वे काही अंतर पुढे नेली, त्यानंतर हा प्रकार थांबला.
धान्य विक्री सुरू असताना देखील नागरिकांनी बेकायदेशीरपणे रेल्वेचा डब्बा फोडून धान्याची पोती लांबवल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग, आरपीएफचे पथक तैनात झाले होते. तोपर्यंत नागरिकांनी रेल्वे स्थानकावरुन पळ काढला होता. हा प्रकार अत्यंत खळबळजनक असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने देखल घेतली आहे. पोती वाहून नेणाऱ्यांपेक्षा ही घटना पाहण्यासाठी तेथे नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.