जळगाव - आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्याने सोमवारी (१४ जून) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यावर्षी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा कोथळी, मुक्ताईनगरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखी सोहळा प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषाने अवघी मुक्ताईनगरी दुमदुमली होती. दरम्यान, परंपरेनुसार जुन्या मंदिरातून निघालेली मुक्ताई पालखी नवीन मंदिरात १८ जुलैपर्यंत मुक्कामी असेल. त्यानंतर १९ जुलै रोजी सकाळी बसने पंढरपूरला निघेल.
मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन
पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष ऍड. रोहिणी खडसे आदींची उपस्थिती होती. पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी सोमवारी पहाटे संत मुक्ताईंची महापूजा, काकडा आरती झाली. सकाळी किर्तनसेवा पार पडली. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. पूजन झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले.
पायी वारीची प्रत्यक्ष अनुभूती नसल्याची वारकऱ्यांना खंत
पूर्वापार चालत आलेला पालखी सोहळा कोरोनाच्या काळात खंडित होतो की काय? अशी शक्यता असताना राज्य शासनाने मात्र, सकारात्मक निर्णय घेत मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत मुक्ताईच्या पादुका पंढरपूरला नेण्यास अनुमती दिली आहे. परंतु, ३३ दिवसांचा ७५० किलोमीटरचा पायी प्रवास तसेच वारी दरम्यान, वारकऱ्यांना मिळणारी सेवा यावेळी खंडित झाल्याची खंत पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी व्यक्त केली.
संत मुक्ताईंच्या दिंडीला आहे त्रिशतकी परंपरा
दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला दिला जातो, त्या संत मुक्ताईंच्या दिंडीला तीन शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील संत मुक्ताई संस्थानाच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते. दिंडीचे यावर्षीचे हे ३१२ वे वर्ष होते. आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांच्या दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला देखील आहे.
महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची दिंडी
आषाढी एकादशीला पंढरपुरात भरणाऱ्या यात्रेवेळी विठ्ठल रखुमाईसह संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत तुकोबारायांच्या भेटीसाठी मुक्ताई निघतात, अशी वारकऱ्यांची भावना आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची दिंडी म्हणून संत मुक्ताईच्या दिंडीची ओळख आहे. कोथळी गावात असलेल्या मुक्ताईच्या जुन्या मंदिरापासून दिंडीला सुरुवात होते. संत मुक्ताईची दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत ३३ दिवसांत तब्बल ७५० किलोमीटरचे अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते. तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती तसेच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडविली जाते. यावेळी संत मुक्ताईला साडीचोळीचा आहेर भावांकडून भेट दिला जातो. पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हा सोहळा मात्र मर्यादित स्वरुपात साजरा होत आहे.
कोरोनाचे संकट टळू दे, सुखाचे दिवस येऊ दे; पालकमंत्र्यांनी घातले साकडे
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले , 'भक्ती, शिस्त आणि शक्तीचे चालते-बोलते व्यासपीठ म्हणजे वारी. आषाढीची वारी ही सर्वांना प्रेरणा देणारी तर शेतकरी, कष्टकऱ्याला आशीर्वाद देणारी आपण समजतो. पण कोरोनामुळे या वारीवर बंधने आली आहेत. कोरोनाचे संकट संपून पुढच्या वर्षी वारी नियमितपणे निघेल, अशी आशा करूया. कोरोनाचे संकट संपू दे, शेतकरी व कष्टकऱ्यांना सुखाचे दिवस येऊ दे, असे साकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी मुक्ताई चरणी घातले.