जळगाव -जिल्ह्यातील जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आज (शुक्रवारी) ऑक्सिजनचा साठा संपल्याने खळबळ उडाली. ऑक्सिजनचा साठा संपल्याने ऑक्सिजन प्रणालीवर असणाऱ्या 11 रुग्णांना तातडीने जळगावच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. या प्रक्रियेत रुग्णालयात पोहोचण्याआधीच एका कोरोनाबाधित महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत संताप व्यक्त केला. ऑक्सिजन अभावी महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा किती हतबल झाली आहे, याचा प्रत्यय आला.
जळगाव जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. काल (गुरुवारी) मुक्ताईनगरात ऑक्सिजनचा तुटवडा होता. तर, आज जामनेरातही हेच चित्र दिसले. जामनेर उपजिल्हा रुग्णालयात 52 बेडची व्यवस्था आहे. त्यापैकी 18 ऑक्सिजनचे बेड आहेत. सर्व बेड फुल्ल असून, दररोज तब्बल 35 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासत आहे. असे असताना दररोज केवळ 20 ते 25 सिलिंडरचाच पुरवठा होत आहे. त्यामुळे दिवसा 12 व रात्री 10 सिलिंडर अशाप्रकारे ऑक्सिजन पुरवून रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाचा सुरू आहे.
तीन दिवसांपासून सिलिंडरचा पुरवठा नाही?
जामनेर उपजिल्हा रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठाच झाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शुक्रवारी प्रत्येक तासाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवली होती. मात्र, त्यानंतरही सिलिंडरचा पुरवठा झाला नाही. म्हणून शुक्रवारी जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील 20 पैकी 11 गंभीर रुग्णांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी शासकीय व खासगी मिळून 8 रुग्णवाहिकांची व्यवस्था केली होती. एका रुग्णवाहिकेत 2 रुग्णांना ऑक्सिजन लावून रवाना केले. या प्रक्रियेत जामनेर तालुक्यातील ढालसिंगी येथील महिलेचा गारखेड्याजवळ मृत्यू झाला. या महिलेची प्रकृती आधीपासून चिंताजनक होती. दरम्यान, या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत वैद्यकीय अधीक्षक विनय सोनवणे यांच्यासह डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले.
प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे स्पष्टीकरण
रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपल्याने 11 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 6 रुग्ण ऑक्सिजनवर ठेवले आहेत. त्यापैकी एका रुग्णाचे नातेवाईक स्वतः ऑक्सिजन सिलिंडर घेऊन आले. ऑक्सिजनचा साठा उपलब्ध न झाल्यास या रुग्णांना देखील इतरत्र हलवण्याची वेळ येऊ शकते. ऑक्सिजनचा साठा संपत असल्याबाबत दर तासाला जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिली. मात्र, पुरवठा झाला नाही. त्यामुळे रुग्णांना हलवण्याची वेळ आली. ज्या महिलेचा मृत्यू झाला, तिची प्रकृती गंभीर होती. तिला ज्या रुग्णवाहिकेतून हलवले होते, त्यात ऑक्सिजनची व्यवस्था होती. त्यामुळे ऑक्सिजन अभावी तिचा मृत्यू झाला, असे म्हणता येणार नाही. प्रकृती चिंताजनक असल्याने कदाचित तिचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांनी दिली.
हेही वाचा - नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी तसेच करन्सी नोट प्रेस 30 एप्रिलपर्यंत बंद