जळगाव - शहरात चौपदरीकरण सुरू असलेल्या महामार्गावर एका भरधाव कंटेनरने दुचाकीस्वार तरुणांना जोरदार धडक देत सुमारे 30 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे. या अपघातानंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी घटनास्थळावर तासभर रास्ताराेको केला. रविवारी (दि. 17 जाने.) दुपारी एक वाजता अजिंठा चौफुली परिसरात हा अपघात झाला.
धवल अंबादास बच्छाव व समाधान श्रीराम चंदन (दोघे रा. गुजरखेडा, ता. येवला, जिल्हा नाशिक), असे दुचाकीस्वारांची नावे असून यातील समाधान चंदन याचा जागेवरच मृत्यू झाला. तर धवल जखमी आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येवला तालुक्यात राहणारे धवल व समाधान हे दोघे मित्र आहेत. फेब्रुवारी, 2020 मध्ये धवलचे लग्न भुसावळ येथील तरुणीशी झाले आहे. पण, काही कारणास्तव त्याची पत्नी गेल्या सात महिन्यांपासून माहेरी निघून गेली आहे. दरम्यान, पत्नीची भेट घेण्यासाठी धवलने समाधानसोबत रविवारी सकाळी येवला येथून दुचाकीने (एमएच 12- 9226) प्रवास सुरू केला. दुपारी एक वाजेच्या सुमारास ते जळगाव शहरात पोहोचले. अजिंठा चौफुलीकडून भुसावळकडे जात असताना समोरुन येणाऱ्या भरधाव कंटेनरने (डीएन 09 एम 9359) दुचाकीस जोरदार धडक दिली. यांनतर दुचाकीसह दोघांना सुमारे 30 फुटपर्यंत फरफटत नेले. यात समाधान याचा जागीच मृत्यू झाला. तर धवलच्या डोक्यावर गंभीर दुखापत होऊन तो बेधुद्ध झाला होता. या अपघातानंतर कंटेनरचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. दोघांचे खिसे तपासले असता एकाचे आधारकार्ड मिळून आले. त्यावरुन ओळख पटवण्यात आले. तर धवलच्या खिशातील मोबाईलवरुन पोलिसांनी काही क्रमांकावर फोन केले. त्यावरुन दोघांचे नाव, पत्ता कळाले. तसेच दोघे भुसावळला धवलच्या सासरवाडीला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परिसरातील नागरिकांनी दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समाधान याला मृत घोषित केले. तर धवलवर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कंटेनरचालकाच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंडरपासची मागणी करत महामार्ग रोखला
संतप्त नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणारच्या कारभारावर संताप व्यक्त करत सुमारे तासभर महामार्ग रोखून धरला होता. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत संतगतीने होते आहे. त्यामुळे सर्व मार्गावर खडीसह इतर साहित्य पडून आहे. तसेच अजिंठा चौफुली परिसरात दुचाकीस्वार, पादचाऱ्यांची रहदारी जास्त असल्यामुळे येथील नागरिकांनी या भागात महामार्गावर अंडरपास (भुयारी मार्ग) तयार करावा, ही मागणी अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. तरी देखील महामार्ग प्राधिकरणाने त्यांची मागणी पूर्ण केली नाही. परिणामी येथे दर महिन्याला अपघात होऊन लोक मृत्यूमुखी पडत आहेत. याच कारणामुळे अपघातानंतर शेकडो नागरिकांनी एकत्र येत महामार्गावर रास्ता-रोको केला. पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह एमआयडीसी व वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त वाढवून गर्दी पांगवली. तासाभरानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
हेही वाचा - भुसावळ : हवेत गोळीबार करून पळ काढणारे पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात