जळगाव- अंत्ययात्रेत मृताला मानवंदना देण्यासाठी बंदुकीने हवेत दोन गोळ्या झाडल्यानंतर तिसऱ्या वेळी बंदूक लॉक होऊन अचानक गोळी सुटली. ही गोळी लागून अंत्ययात्रेत आलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावात आज घडली. तुकाराम वना बडगुजर (वय ६०, रा. पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
या घटनेनंतर बंदुकीने फायर करण्याची परवानगी होती का, अशा पद्धतीने एखाद्या मृतास बंदुकीने फायर करून मानवंदना देत येते का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता. त्यामुळे कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
पिंप्री येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांचे वडील श्रावण बारकू मोहकर (वय ८५) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली. यावेळी श्रावण मोहकर यांना मानवंदना देण्यासाठी विठ्ठल मोहकर यांचा मुलगा दीपक याने आपल्या बंदुकीमधून हवेत फायर केले. दोन फायर व्यवस्थित झाले. परंतु तिसऱ्या फायरला बंदूक लॉक झाली. त्यामुळे दीपक बंदूक आडवी करून तिला तपासत असतानाच बंदुकीतून अचानक गोळी सुटून ती अंत्ययात्रेत आलेले तुकाराम बडगुजर यांना लागली. त्यांना त्वरित जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर मृत बडगुजर यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.