जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाचा वेग कायम आहे. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ११६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आज (बुधवारी) दिवशीही ११४ रुग्णांची भर पडल्याने जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद झाले आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा आकडा आता १३९५ वर पोहचला आहे.
जिल्हा प्रशासनाला मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तब्बल ११६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यापाठोपाठ आज बुधवारी देखील प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ११४ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने जळगाव जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. जिल्हाभरात आतापर्यंत १२९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे
जळगाव जिल्ह्यात आज बुधवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ०९, भुसावळ १६, अमळनेर ३९, धरणगाव ०३, यावल ०५, एरंडोल ०५ तसेच जामनेर ११, जळगाव ग्रामीण ०४, पारोळा २१, बोदवड ०१ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १३९५ इतकी झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.