जळगाव - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुरब्बी नेते आहेत. आपला आक्रमक स्वभाव आणि कामाच्या शैलीमुळे ते सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या याच स्वभावामुळे कार्यकर्ते त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात. जळगावातही अजित पवारांवर जीव ओवळणारा असाच एक कार्यकर्ता आहे. अरविंद बंगालसिंह चितोडिया असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. सध्या अरविंद चितोडिया चर्चेत आला आहे. तो त्याच्या एका उपक्रमामुळे.. अजित पवारांचा 22 जुलै रोजी वाढदिवस येत आहे. या निमित्ताने अजित पवारांना जनतेचे आशीर्वाद मिळून उदंड आयुष्य लाभावे, ते राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, म्हणून अरविंद चक्क 30 क्विंटल साखर लोकांना घरोघरी जाऊन वाटत आहे.
उपक्रमाची जिल्ह्यात चर्चा
जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी असलेला अरविंद चितोडिया हा, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हीजेएनटी सेलचा जिल्हाध्यक्ष आहे. अजित पवारांना नेता मानणारा अरविंद हा दरवर्षी अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी समाजहिताचा उपक्रम राबवत असतो. यापूर्वी त्याने रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिरे घेतली आहेत. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी रक्तदान किंवा आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यापेक्षा लोकांना उपयोगात येईल, असा काहीतरी वेगळा उपक्रम राबविण्याचा विचार अरविंदने केला. याच विचारातून त्याने लोकांना 30 क्विंटल साखर स्वखर्चाने वाटण्याचा निर्णय घेतला. सध्या तो आणि त्याचे सहकारी जामनेर तालुक्यातील वाघारी-बेटावद जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये फिरून लोकांना घरोघरी साखर वाटप करत आहेत. त्याच्या या उपक्रमाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
साखर वाटण्याचे कारण?
'ईटीव्ही भारत'शी बोलताना अरविंद चितोडिया याने 30 क्विंटल साखर वाटण्याचे कारण सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील मुरब्बी नेते आहेत. त्यांची कार्यशैली मला भावते. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांची असते. त्यामुळे अशा नेत्याला उदंड आयुष्य लाभावे म्हणून जनतेचे आशीर्वाद मिळायला हवेत. हेच आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही लोकांना घरोघरी जाऊन साखर वाटत आहोत. साखरेने लोकांचे तोंड गोड व्हावे, अजित पवारांबद्दल त्यांच्या मनात चांगली भावना निर्माण व्हावी, म्हणून आम्ही साखर वाटप करत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून अजित पवारांना जनतेकडून चांगले आशीर्वाद मिळतील, अशी आम्हाला खात्री आहे, असेही अरविंद याने सांगितले.
'अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे'
अरविंद चितोडिया पुढे म्हणाला की, अजित पवारांना उदंड आयुष्य मिळावे, त्यांना जनतेचे आशीर्वाद मिळावे आणि ते पुढे मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची मनस्वी इच्छा आहे. त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा घडेल, राज्याचा सर्वांगीण विकास होईल, अशा भावना अरविंद याने यावेळी व्यक्त केल्या.
35 गावांमध्ये साखर वाटपाचे नियोजन -
अरविंद चितोडिया याने भुसावळ आणि जामनेर तालुक्यातील सुमारे 35 गावांमध्ये घरोघरी साखर वाटप करण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमात प्रत्येक घरी एक किलो साखरेची पिशवी वाटप केली जात आहे. गावात साखर वाटप रथ फिरतो. अरविंद आणि त्याचे सहकारी याचे नियोजन सांभाळत आहेत. अरविंदला त्याचे वडील बंगालसिंह चितोडिया यांनीही प्रोत्साहन दिले आहे. ते स्वतः या उपक्रमात सहभागी आहेत.
हेही वाचा - PowerGame? : शरद पवारांनी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट, तासभर खलबतं; तर्क-वितर्कांना उधाण