जळगाव - जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील नेहता गावात सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 73 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने संतापाच्या भरात पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कमलाबाई फकिरा वैदकर (वय 63) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. तर फकिरा तुकाराम वैदकर (वय 73) असे त्यांच्या पतीचे नाव आहे. दोघेही रावेर तालुक्यातील नेहता गावातील रहिवासी होते.
या घटनेचे मूळ कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, कौटुंबीक वादातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर वर्तवला आहे. वैदकर दाम्पत्य हे नेहता गावातील समाज मंदिरामागे असलेल्या नवीन प्लॉट भागात राहत होते. फकिरा वैदकर हे तापट स्वभावाचे होते. तापट स्वभावामुळे त्यांचे त्यांच्या दोन मुलांशीही पटत नव्हते. त्यांची दोन्ही मुले गावातच वेगळे राहत होते. फकिरा वैदकर नेहमी क्षुल्लक कारणावरून पत्नीशी वाद घालत असत. ते पत्नीला नेहमी जीवे मारण्याची भाषा वापरत असत, अशी माहिती पोलिसांनी काही ग्रामस्थांचे जबाब नोंदवल्यानंतर समोर आली आहे. एखाद्या विषयावरून दोघांमध्ये वाद झाला असावा, त्यातूनच ही घटना घडल्याची शक्यता आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दूध घेवून नात आली अन् घटना आली समोर -
सोमवारी सकाळी वैदकर दाम्पत्याची नात हर्षाली ही घरी दूध घेऊन आली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. फकिरा वैदकर यांनी पत्नी कमलाबाई यांच्या गळ्यावर तीक्ष्ण विळ्याने वार करून त्यांचा खून केला. गळ्यावर विळ्याने वार झाल्यामुळे त्या विजेच्या सुरू असलेल्या शेगडीवर पडल्या. त्यामुळे त्या भाजल्या गेल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर फकिरा यांनी शेजारच्या खोलीत जाऊन गळफास घेत स्वतःही आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर नेहता येथील सरपंच महेंद्र पाटील, पोलीस पाटील सरला कचरे यांनी रावेर पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.