जळगाव - रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून जमिनीवर कोसळलेल्या तरुणाला पाठीमागून येणार्या अज्ञात वाहनाने चिरडले. ही घटना रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील शिवकॉलनी रेल्वे पुलाजवळ घडली. उज्ज्वल उर्फ पप्पू सोपान सोनवणे (25, रा. सावखेडा बुद्रुक, ता. जळगाव) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, शहरात सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालकाचा बळी गेल्याने लोकभावना तीव्र झाल्या आहेत.
उज्ज्वल सोनवणे हा खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकाचा जेवणाचा डबा देण्यासाठी शहरात आला होता. जेवणाचा डबा दिल्यानंतर तो घरी परत जात होता. शिवकॉलनी रेल्वे पुलाजवळ रस्त्यावरील खड्ड्यात त्याची दुचाकी घसरली. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. याचवेळी त्याच्या पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या चाकाखाली आल्याने उज्ज्वलचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी तसेच शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
6 महिन्यांपूर्वी झाला होता विवाह -
दरम्यान, अपघातात ठार झालेल्या उज्ज्वलचा 6 महिन्यांपूर्वीच विवाह झालेला होता. या घटनेमुळे सोनवणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उज्ज्वलच्या पश्चात आई-वडील, पत्नी, 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे.