जळगाव - राज्य सरकारने पाचव्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. मात्र, पाचव्या लॉकडाऊनमध्ये १ ते १२ जूनपर्यंतच्या १२ दिवसातच जळगाव जिल्ह्यात तब्बल ८३४ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दीड हजारांच्या वर आहे. २४ मार्चपासून लागू झालेल्या पहिल्या लॉकडाऊनपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येच्या सरासरीचा विचार केला तर जिल्ह्यात दर दिवसाला साधारणपणे २० कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, आता नागरिकांनी वेळोवेळी हात धुणे, प्रतिबंधित क्षेत्राचे कडक पालन व फिजिकल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊनमध्ये शिथिलता असली तरी कामाशिवाय बाहेर निघणे टाळण्याची खूप गरज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सहाशेपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते आपल्या घरी परतले आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच २४ मार्चपासून दर दिवसाला सरासरी ७ ते ८ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे रुग्ण वाढण्याचे प्रमाण दर दिवसाला सुमारे २० इतके आहे. म्हणजेच रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणापेक्षा १० ते १२ रुग्ण अधिक वाढतच आहेत.
पाचव्या लॉकडाऊनमध्ये अवघ्या १२ दिवसात वाढले ८३४ रुग्ण-
२४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर ३१ मेपर्यंत चौथा लॉकडाऊन समाप्त होण्याच्या ६८ दिवसात जिल्ह्यात एकूण ६९२ रुग्णांची वाढ झाली होती. तर पाचव्या लॉकडाऊनच्या पहिल्या १२ दिवसातच तब्बल ८३४ रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेसाठी जिल्ह्यात वाढत जाणारी रुग्णसंख्या आता धोकेदायक ठरत आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर परिस्थिती झाली बिकट-
२४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील रुग्णवाढीची सरासरी संख्या ही केवळ ०.०९ टक्के इतकी नगण्य होती. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये म्हणजेच १५ एप्रिल ते ३ मेपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये रुग्णसंख्या वाढीची सरासरी दर दिवसाला २.३८ टक्के इतकी झाली. ४ ते १७ मेपर्यंतच्या तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये ही सरासरी १५.१४ टक्के इतकी झाली. १८ ते ३१ मे पर्यंतच्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये रुग्णवाढीची सरासरी दर दिवसाला ३१.०७ टक्के झाली. तर १ जूनपासून लागू झालेल्या पाचव्या लॉकडाऊच्या पहिल्या १२ दिवसातच म्हणजेच १२ जूनपर्यंत ही सरासरी तब्बल ७५.८१ टक्के इतकी झाली आहे.
लॉकडाऊननिहाय वाढलेली रुग्णसंख्या-
लॉकडाऊन १ - २ रुग्ण
लॉकडाऊन २ - ४५ रुग्ण
लॉकडाऊन ३ - २५७ रुग्ण
लॉकडाऊन ४ - ६९२ रुग्ण
लॉकडाऊन ५ - १५७८ रुग्ण
लॉकडाऊननिहाय रुग्णवाढीची सरासरी-
लॉकडाऊन १ - ०.०९ टक्के
लॉकडाऊन २ - २.३८ टक्के
लॉकडाऊन ३ - १५.१४ टक्के
लॉकडाऊन ४ - ३१.०७ टक्के
लॉकडाऊन ५ - ७५.८१ टक्के