जळगाव - गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह चोपडा तालुक्यातील तापी नदीपात्रात आढळून आला आहे. चंद्रकांत शांताराम मराठे (३२) असे या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे़. त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर येथे वास्तव्यास असलेला चंद्रकांत मराठे हा तरूण स्टेडियमजवळील खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता. २९ सप्टेंबरला सकाळी ८ वाजता तो दुचाकी (क्र.एमएच १९, डब्ल्यू ५८७०) घेवून काहीही न सांगता घराबाहेर पडला. मुलगा कामाला गेला असेल असे कुटूंबीयांना वाटले मात्र, तो बराच वेळ झाला तरी घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांना शंका आली. कुटुंबीयांनी लगेच त्याचा शोध घेण सुरू केले मात्र, रात्री उशिरापर्यंत तो कुठेही आढळून आला नाही. अखेर वडील शांताराम यांनी ३० सप्टेंबरला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
मृत चंद्रकांत ज्या दुचाकीवर घरातून बाहेर पडला होता, ती दुचाकी गुरूवारी जळगाव तालुक्यातील विदगाव पुलाजवळ पोलिसांना आढळून आली. ती दुचाकी ही यावल तालुक्याच्या हद्दीत असल्यामुळे ती यावल पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी परीसरात चंद्रकांतचा शोध सुरू केला.मात्र तो आढळला नाही, त्यामुळे त्याने नदीत उडी घेवून आत्महत्या केली असावी, असाही संशय पोलिसांना बळावला होता.
दरम्यान, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील तपासी पोलीस हवालदार संजय झाल्टे व मनोज पाटील यांनी त्याच्याबद्दल वायरलेसद्वारे माहिती दिली होती. यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता चोपडा तालुक्यातील तापी नदीत तरूणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर तो चंद्रकांतचा असल्याचे स्पष्ट झाल्याने तेथील पोलीस पाटीलांनी शहर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. चंद्रकांतने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय झाल्टे करीत आहे.