जळगाव - भुसावळ शहरात काल (रविवारी) रात्री चार ते पाच जणांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून एका 17 वर्षीय मुलाचा डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याचा खून केला. रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. शेख कैफ शेख जाकीर (रा. पंचशील नगर, भुसावळ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
शेख कैफ याच्या मोठ्या भावाचा एका तरुणाशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. नंतर हा वाद मिटवण्यात आला होता. परंतु, त्यानंतर रविवारी रात्री संबंधित तरुण, त्याचे वडील आणि इतर दोन ते तीन जणांनी शेख कैफ याच्या भावाशी पुन्हा वाद घातला. हा वाद सोडवत असताना शेख कैफ याच्या डोक्यात टोळक्यातील तरुणांनी लोखंडी रॉडने वार केले. त्यात गंभीर दुखापत होऊन शेखचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत शेख कैफ हा कपडेविक्री करत असे.
रुग्णालयात नातेवाईकांकडून तोडफोड -
या घटनेमुळे मृत शेख याचे कुटुंबीय घाबरून गेले. त्यांनी शेख याला रक्तबंबाळ अवस्थेत शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड केली, असा आरोप डॉक्टरांनी केला. शेख याला मृतावस्थेत रुग्णालयात आणले होते. त्याला तपासूनच मृत घोषित केले. मात्र, तरीही रुग्णालयात तोडफोड केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासंदर्भात नातेवाईकांच्या विरुद्ध डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.