जळगाव - भाजपाला बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी आहेत. राजपूत समाजाच्या 8 टक्के मतांवर डोळा ठेवूनच भाजपाकडून 'सुशांतसिंह राजपूत जिंदाबाद' अशी घोषणा दिली जात आहे, असा चिमटा शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढला. गुलाबराव पाटील हे आज (रविवारी) सायंकाळी जळगावात आले होते. शहरातील अजिंठा विश्रामगृहात असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटलांनी शिवसेनेचा दसरा मेळावा, बिहार निवडणूक, भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर होणारी टीका अशा विषयांवर मते मांडली.
'बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतला न्याय देण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू असताना विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार, सीबीआयने तपास हाती घेतला. दीड महिने तपास केल्यानंतर त्यात काय तथ्य निघाले तर, सुशांतसिंहने आत्महत्या केली. त्याचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. ही गोष्ट किंवा राज्य सरकार सांगत नाही. विरोधकांच्या आग्रहानुसार जी एजन्सी या प्रकरणाच्या तपासकामी नेमण्यात आली, तिच्या तपासात या बाबी समोर आल्या आहेत. आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत की, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण हे भाजपाने सोडलेले पिल्लू आहे. भाजपाला बिहारमध्ये राजपूत समाजाची असलेली 8 टक्के मते हवी आहेत, म्हणूनच ते 'सुशांतसिंह जिंदाबाद' असे म्हणत आहेत, असा आरोपही पाटलांनी केला.
ही तीनचाकी सायकल चालतच राहणार -
भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर तीनचाकी सायकल म्हणून टीका केली जात असून हे सरकार कधीही कोसळेल, असे वारंवार सांगितले जात आहे. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपा नेत्यांच्या या टीकेला आता वर्ष होत आले आहे. पण अजूनही सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यापुढेही पाच वर्षे आमचे सरकार काम करतच राहील, असा दावा गुलाबराव पाटलांनी केला.
दसरा मेळावा वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार होणार -
शिवसेनेचा मुंबईत होणारा दसरा मेळावा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होईल किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. याबाबत पाटील म्हणाले की, शिवसेनेचा दसरा मेळावा कसा होईल, याचा निर्णय येत्या काही दिवसात होईल, असे आमचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. हा मेळावा कशा पद्धतीने होईल, हे वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवारांच्या प्रयत्नानेच आजची सत्ता -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची वर्षभरापूर्वी सातारा येथे भरपावसात जाहीर सभा झाली होती. वयाने ज्येष्ठ असलेल्या नेत्याने अशा पद्धतीने सभा घेतल्याने त्यावेळी जनतेची सहानुभूतीदेखील मिळाली होती. ही सभा अविस्मरणीय होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील अशाच पद्धतीने सभा झाली होती, अशी आठवण सांगत गुलाबराव पाटलांनी शरद पवारांच्या प्रयत्नानेच आजची सत्ता असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढले.