जळगाव - कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यातील प्रमुख हॉटस्पॉट असलेल्या जिल्ह्यांपैकी जळगाव जिल्हा एक होता. मात्र, आता जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याने राज्य सरकारने दैनंदिन व्यापार, व्यवहार तसेच हालचालींवर घातलेले निर्बंध हटवण्याची मागणी होऊ लागली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. संभाव्य तिसरी लाट कधी येईल, याबाबत साशंकता आहे. म्हणून राज्य सरकारने पूर्णवेळ व्यापाराला परवानगी देण्याच्या मागणीसाठी जळगावातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. मागणीची दखल घेतली नाही तर व्यापारी सविनय कायदेभंग करण्याच्या तयारीत आहेत.
कोरोनाची परिस्थिती आहे नियंत्रणात -
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट अवघा 0.19 टक्के इतका आहे. रिकव्हरी रेटचा विचार केला तर तो 98.14 टक्के इतका समाधानकारक आहे. जिल्ह्यात आजमितीला कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण 77 असून, त्यात लक्षणे असलेले रुग्ण फक्त 31 आहेत. ऑक्सिजनवर 15 तर 8 रुग्ण हे आयसीयूत उपचार घेत आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 46 रुग्णांना कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. ही स्थिती दिलासादायक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध हटविण्यात यावेत, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची शिखर संस्था म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या वतीने राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु, सरकार सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने आता व्यापारी आक्रमक झाले आहेत.
हे ही वाचा - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट' नामफलकाची शिवसेनेकडून तोडफोड
काय आहे जिल्हा व्यापारी महामंडळाची भूमिका-
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग ओसरल्याने आता पूर्णवेळ व्यापाराला परवानगी देण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे सचिव ललित बरडिया यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात आता कोरोना नियंत्रणात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना पूर्णवेळ व्यापार करू द्यायला हरकत नाही. सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी अडचणीत आले आहेत. जळगाव शहराचा विचार केला तर याठिकाणी कापड, किराणा, इलेक्ट्रॉनिक, सराफ अशा क्षेत्रातील लहान-मोठे मिळून सुमारे 25 ते 30 हजार व्यापारी आहेत. सर्वजण अक्षरशः हैराण झाले आहेत. निर्बंध नसताना जळगावात दिवसाला सुमारे 250 ते 300 कोटी रुपयांची उलाढाल होत असे. पण आता सायंकाळी 4 वाजेपर्यंतच व्यापाराला परवानगी असल्याने ही उलाढाल निम्म्यावर आली आहे. आठवड्याला शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन, उर्वरित 5 दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत व्यवहार होतात. 5 ते 6 तासात मर्यादित व्यवसाय होतो. त्यामुळे व्यापाऱ्यांचा मूड गेला आहे. निर्बंधांमुळे बाहेरगावचा ग्राहकही खरेदीला यायला उत्सुक नसतो. ही बाब सरकारच्या कधी लक्षात येणार? एकीकडे सारे सुरळीत असताना व्यापारावरील निर्बंध म्हणजे सूड उगवण्याचा प्रकार आहे. सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर व्यापारी आक्रमक होतील, असेही बरडिया यांनी सांगितले.
हे ही वाचा -Tokyo Olympics (Women's Hockey): ऑस्ट्रेलियाला 1-0 ने नमवत भारताची उपांत्य फेरीत धडक
साऱ्या गोष्टी अनुकूल असताना निर्बंध कशाला?
जळगावातील दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी सांगितले की, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. सार्या गोष्टी अनुकूल असताना व्यापारावर निर्बंध कशाला हवेत? सरकार व्यापाऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करणार आहे की नाही. लॉकडॉऊनमुळे व्यापारी हवालदिल झाले आहेत. कर्जाची परतफेड, कर, कामगारांची देणी व्यापाऱ्यांना सुटलेली नाहीत. मात्र, व्यापाराची गाडी रुळावर नाही. अशा परिस्थितीत आम्ही काय करायचे? राज्य सरकार जे निर्बंध घालते, ते सर्वांच्या हितासाठी घालते, हे मान्य आहे. परंतु, आतापर्यंत निर्बंध घातल्याने कोरोना खरोखर चालला गेला का? हा देखील प्रश्न आहे. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नाही, याचाही शासनाने विचार करायला हवा, असे प्रवीण पगारिया म्हणाले.
राज्य सरकारच्या आदेशानंतरच होणार निर्णय -
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले आहेत. या संदर्भात राज्य सरकारच्या स्तरावर विचारविनिमय सुरू आहे. जोपर्यंत राज्य सरकार आदेश देत नाही, तोपर्यंत स्थानिक पातळीवर निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय जाहीर करता येणार नाही. राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार स्थानिक पातळीवर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय होईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.