जळगाव - संसारवेल बहरल्यानंतर त्याचे पत्नीच्या लहान बहिणीशी सूत जुळले. दोघेही सातजन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेत असताना त्यांच्या अनैतिक संबंधांची कुणकुण कुटुंबीयांना लागली. समाजात बदनामी होईल म्हणून कुटुंबीयांनी दोघांना एकमेकांपासून दूर राहण्यास सांगितले. मात्र, एकमेकांशिवाय राहू न शकणाऱ्या मेहुणा-मेहुणीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडली.
समीर (बदललेले नाव) आणि त्याचे सासरे हे मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत. ४ ते ५ वर्षांपूर्वी ते उदरनिर्वाहासाठी चोपडा तालुक्यात स्थायिक झाले होते. समीर तालुक्यातील एका व्यक्तीकडे सालगडी म्हणून कामाला होता. तर त्याचे सासरे तेथेच शेतमजुरी करत होते. लग्नानंतर काही दिवसांनी समीरचे मेहुणीशी प्रेमसंबंध जुळले. मात्र, कुटुंबीयांना त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती झाल्यानंतर विरोध सुरू झाला. समाजात बदनामी होईल, म्हणून दोघांनी एकमेकांपासून दूर राहण्यास सांगितले. मात्र, दोघेही कुटुंबीयांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. या कारणावरून दोघांच्या नातेवाईकांमध्ये वाद देखील झाले. रविवारी समीर आणि त्याच्या मेहुणीने शेतातील झाडाला एकाच दोरच्या सहाय्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.