जळगाव- दहावी, बारावीच्या परीक्षेच्या भीतीने आणि अभ्यासाच्या ताणामुळे विद्यार्थ्यांचाच नाही तर पालकांच्या देखील काळजाचा ठोका चुकतो. मात्र, जळगावातील राष्ट्रीय बाल कीर्तनकार माई पाटील या विद्यार्थिनीने बारावी परीक्षेच्या काळातही रात्री ११ वाजेपर्यंत कीर्तन आणि पहाटे ४ वाजता उठून नियमित अभ्यास, असा दिनक्रम सांभाळत घवघवीत यश संपादन केले आहे. माईने ८५ टक्के गुण मिळवत कला शाखेतून महाविद्यालयात तृतीय येण्याचा मान मिळवला.
माई पाटील ही जळगाव शहरातील शिव कॉलनी येथे राहते. ती मूळजी जेठा महाविद्यालयाची कला शाखेची विद्यार्थिनी आहे. पाटील कुटुंबाला वारकरी सांप्रदायाचा वारसा असल्याने माईला बालपणापासून कीर्तनाची गोडी लागली. आईच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदाय तसेच संत साहित्याचे शिक्षण घेतल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून ती कीर्तन करत आहे. 'खान्देशची बुलंद तोफ' म्हणून तिची ओळख असून, संपूर्ण महाराष्ट्रात कथा, कीर्तनाद्वारे ती समाज प्रबोधन करीत आहे. माईने आतापर्यंत ३ हजार कीर्तने, १६ भागवत कथा, १ हजार रामकथा व शिवचरित्र व्याख्याने आणि इतर २० व्याख्याने दिली आहेत.
बारावीसारख्या महत्त्वाच्या वर्षाला असतानाही माईने कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन करणे थांबवले नाही. बारावीचा अभ्यास किंवा कीर्तन यातून कोणताही एक पर्याय न निवडता माईने दोघांचा समन्वय साधत यशाला गवसणी घातली आहे. अभ्यासाला वेळ पुरत नाही, अशी तक्रार करणाऱ्या विदयार्थ्यांना माईने मिळवलेले यश निश्चितच डोळ्यात अंजन घालणारे आहे. दहावीत देखील तिने ९३ टक्के गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. पुढे वकिलीचे शिक्षण घ्यायचा तिचा मानस आहे.
कीर्तनासोबतच माईला विविध छंद जोपासायला आवडतात. तिला कथ्थकची अधिक आवड असून, कथ्थक विशारद होण्यासाठी तिने परीक्षादेखील दिल्या आहे. कराटेची देखील तिला आवड असून यातही ती मास्टर आहे. आपल्या आजवरच्या यशात आपल्या आई-वडिलांचा मोठा हात असल्याचे ती सांगते. कोणतीही गोष्ट मनापासून केली तर यश हमखास मिळते, असा सल्ला देखील माईने विद्यार्थ्यांना दिला आहे.