जळगाव - खान्देश कस्तुरी मंचतर्फे आयोजित खान्देश महोत्सवात सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेत चक्क 65 वर्षाच्या आजीने सहभाग नोंदवला. तसेच तरुणी महिलांना लाजवेल असा रॅम्पवॉक करत आजीबाईने सर्वांचेच लक्ष वेधले. इतकेच नाही तर खान्देशातील पारंपरिक वेशभूषेतील आजीबाईने रॅम्पवॉक करत स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला. भिकुबाई भगवान महाजन असे या आजीबाईचे नाव आहे. ( Cultural Festival of Khandesh 2021 )
अहिराणी बोलीभाषेचा प्रचार प्रसारासाठी खान्देश कस्तुरी मंचतर्फे अमळनेरात दोन दिवसीय राज्यस्तरीय खान्देश महोत्सव पार पडला. खान्देशातील चालिरीती, प्रथा, परंपरा यावर आधारित विविध कार्यक्रम पार पडले. अहिराणी भाषेवर चर्चासत्र, काव्यवाचन, गीतगायन, उखाणे, खान्देशी वेशभूषेत महिलांचा सौंदर्यसम्राज्ञी हा कार्यक्रम झाला.
हास्यकलाकार श्याम राजपूत उपस्थित -
कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी अहिराणी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक सुभाष आहिरे, मराठीतील प्रसिध्द मालिका हास्यजत्रा फेम श्याम राजपूत, पोलीस कलाकार संघपाल तायडे, खान्देश कस्तुरी अहिराणी मंचच्या राज्याच्या अध्यक्षा विजया मानमोडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. दोन दिवसीय महोत्सवात चर्चासत्र काव्यसंमेलन व अहिराणी भाषेवर आधारित पारंपारिक वेशभूषा अहिराणी गीतांवर खान्देश सौंदर्यसम्राज्ञी ही स्पर्धा झाली.
हेही वाचा - Girna River Conservation : गिरणा नदीच्या संवर्धनासाठी ‘गिरणा परिक्रमा’ उपक्रमाला जळगावातून सुरुवात
अभिनेते श्याम राजपुत यांनी अहिराणी भाषेत मनोगत व्यक्त करत उपस्थितांना पोट धरून हसविले. सर्व मान्यवरांनी अहिराणी भाषेतच मनोगते व्यक्त केली. यावेळी वर्दीतील गायक पोलीस कलाकार संघपाल तायडे यानेही अहिराणी भाषेतील गीत सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. आयोजक खान्देश कस्तुरी मंचच्या महिलांनी यावेळी अहिराणी गीतांवर नृत्य सादर केले.
अहिराणी भाषेला बोलीभाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी राज्यकर्ते अपयशी ठरत आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या नाशिक येथील साहित्य संमेलनात अहिराणी भाषेच्या नामोल्लेख न करण्यात आल्याने त्याबद्दलही जेष्ठ साहित्यिक सुभाष अहिरे यांनी खंत व्यक्त केली. या खान्देश महोत्सवाचा रविवारी (26 डिसेंबर 2021) खान्देश सौदर्यं सम्राज्ञी स्पर्धेने समारोप झाला. वयाच्या 18 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत सर्व महिलांनी खान्देश वेशभूषा परिधान करत स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील 65 वर्षांच्या आजीने सहभाग घेवून रॅम्पवॉक करत सर्वांचे लक्ष वेधले व प्रथम क्रमांक पटकाविला.
विजयी मानकरी -
- कुमारी गटात - प्रथम क्र. कुमारी भुमीका धनंजय सोणवने, द्वितीय क्र. कुमारी प्रतिक्षा चंद्रकांत बरासकर आणि तृतीय क्र. कुमारी सिद्धी विलास चौधरी
- सोनेरी गटात - प्रथम क्र. भारती सुरेश पाटील, द्वितीय क्र. स्वाती शिवम देशमुख , तृतीय क्र. वैष्णवी प्रथमेश पवार
- रुपेरी गटात - प्रथम क्र. भिकुबाई भगवान महाजन, द्वितीय क्र. विभागुन कविता अभिजीत बाविस्कर आणि वैशाली मधुकर नारळे, तृतीय क्र. पुनम हरीश आगरवाल यांनी क्रमांक पटकाविला. दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन म्हस्के, शितल सावंत, प्रविण माळी यांनी केले.