जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे महिनाभराच्या कालावधीनंतर बुधवारी रात्री मुंबईहून जळगावात परतले. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भोसरीच्या जमीन खरेदीसंदर्भात सुरू असलेली ईडीची चौकशी आणि नुकतेच समोर आलेले भाजप खासदार रक्षा खडसेंच्या प्रकरणाबाबत मौन बाळगले आहे. गुरुवारी त्यांनी जळगावात माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. 'नो कमेंट्स' म्हणत ते जळगावातून मुक्ताईनगरच्या दिशेने रवाना झाले.
पुण्यातील भोसरी औद्योगिक वसाहतीतील एका भूखंडाच्या व्यवहार प्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) एकनाथ खडसे यांना महिनाभरापूर्वी चौकशीचे समन्स बजावले होते. त्यानंतर खडसे चौकशीसाठी मुंबईला गेले होते. परंतु, चौकशी पूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ते मुंबईतच क्वारंटाईन होते. कोरोनातून बरे झाल्याने ते ईडी समोर चौकशीला सामोरे गेले. दरम्यान, या घडामोडीनंतर खडसे बुधवारी रात्री मुंबईहून जळगावात परतले. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ते मुक्ताईनगरला रवाना झाले.
'नो कमेंट्स' म्हणत नाकारली प्रतिक्रिया-
मुक्ताईनगरला रवाना होत असताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, खडसेंनी कोणत्याही प्रकारचे भाष्य करणे टाळले. 'नो कमेंट्स' म्हणत त्यांनी प्रतिक्रिया नाकारली. दरम्यान, भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर खासदार रक्षा खडसेंच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख केल्याच्या प्रकरणाबाबतही खडसेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
हेही वाचा- अर्थसहाय्य अभावी रखडलेले प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन- गडकरी