जळगाव - जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या नायगाव ग्रामपंचायत निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण, या ठिकाणी पती-पत्नीत थेट सामना रंगला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भावकीची लढाई अधिक असते. अनेक ठिकाणी भाऊ विरुद्ध भाऊ, दीर विरुद्ध भावजय अशा लढती होतात. परंतु, नायगावात पतीविरुद्ध पत्नीनेच निवडणुकीच्या मैदानात आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे दोघेही उच्चशिक्षित असून, माजी सरपंचही आहेत.
यावल तालुक्यात सातपुड्याच्या कुशीत वसलेले नायगाव हे सुमारे सहा ते साडेसहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात पाच प्रभाग आहेत, तर ग्रामपंचायत सदस्यांची संख्या १३ इतकी आहे. नायगाव येथील नरेंद्र रंगराव पाटील यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी मीनाक्षी नरेंद्र पाटील या मैदानात आहेत. प्रभाग क्रमांक पाच (ब) मधून ही लढत होत आहे.
पती की पत्नी, कोण बाजी मारणार?
नरेंद्र पाटील व मीनाक्षी पाटील हे दोघे गावातील माजी सरपंच आहेत. २००५ ते २०१० या कालावधीत मीनाक्षी पाटील सरपंच होत्या, तर २०१० ते २०१५ च्या कालावधीत नरेंद्र पाटील सरपंच होते. यावेळी दोघांनी निवडणुकीत आपले अर्ज दाखल केले असून, त्यांच्यात कोण बाजी मारते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गावाच्या विकासासाठी दोघांची उमेदवारी-
नरेंद्र पाटील व मीनाक्षी पाटील यांच्यात कौटुंबीक वाद आहे. मात्र, तो सामोपचाराने सोडवण्याचाही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दोघांना राजकारणाचा अनुभव आहे. गावाच्या विकासासाठी आपण उमेदवारी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता जनमताचा कौल कोणाच्या बाजूने लागतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जनमताचा कौल मान्य असेल- मीनाक्षी पाटील
नायगावच्या विकासासाठी आपण कार्य करीत आहोत. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आपण विकासासाठी मैदानात आहोत. जनतेचा कौल आपल्याला मान्य असेल, असे मत उमेदवार मीनाक्षी पाटील यांनी मांडले.
'प्रतिस्पर्ध्यापेक्षा गावाचा विकास महत्त्वाचा'
राजकारण ही आपली प्रतिष्ठाही नाही. गावाच्या विकासासाठी आपण समाजसेवा करीत आहोत. पत्नीच्या विरोधात आपली लढत होईल व जनतेचा कौल आपल्याला मान्य असेल. माझ्यासमोर उमेदवार कोण आहे, याला महत्त्व दिलेले नाही. गावाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच ग्रामस्थांची इच्छा आहे. नरेंद्र पाटील हे जाणकार आहेत, त्यांनी सरपंच म्हणूनही चांगले काम केले आहे. त्यांना यश येईल, असा विश्वास काही ग्रामस्थांनी व्यक्त केला. दरम्यान, पती व पत्नी हे सामोपचाराने एकत्र यावेत, ही सर्वांची इच्छा असल्याचा मनोदय देखील काही ग्रामस्थांनी व्यक्त केला.