जळगाव - देशात नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या सहा 'न्यू फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट'पैकी एक प्रशिक्षण संस्था जळगाव विमानतळावर सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालय व भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्या कार्यालयातून प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रात जळगावचा समावेश असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
रायबरेली येथे सर्वात आधी 'फ्लाईंग ट्रेनिंग' देणारे देशातील पहिले फ्लाईंग ट्रेनिंग सेंटर सुरू केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात गोंदिया येथे 'फ्लाईंग ट्रेनिंग' सेंटर २००८ मध्ये सुरू झाले. आता पंतप्रधान कार्यालय व भारतीय विमान प्राधिकरणाने नवीन सहा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
नाईट लँडिंग सुविधेसह परिपूर्ण
जळगाव विमानतळावरून केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टॅण्डिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नातून नाईट लँडिंग सुविधा साकरण्यासाठी मोठा निधी प्राप्त झाला होता. गेल्या वर्षभरात विमानतळाच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी 50 कोटी खर्च करण्यात आले आहेत. या विमानतळावर सध्याचे स्थितीत अहमदाबाद, मुंबई या विमान फेऱ्या सुरू आहेत.
सहा नवीन उड्डाण प्रशिक्षण संस्था देशात बेळगाव, खजुराहो, कलबुर्गी, लीलाबरी, सालेम या पाच विमानतळासोबत सहावे जळगाव विमानतळ नवीन फ्लाईट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे.