जळगाव - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटला एका नराधमाने प्राध्यापिकेला अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती ४० टक्के भाजली असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेला काही तास उलटत नाही, तोच आज औरंगाबाद आणि मुंबईत अशाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलावर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दक्षिणेतील नराधमांना पोलिसांना जशा गोळ्या घातल्या, तशाच पद्धतीने अत्याचाऱ्यांना शासन व्हायला हवे, अशा भावना जळगावातील बेंडाळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या.
महाराष्ट्रासह देशभरात महिला अत्याचाऱ्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने समाजमन सुन्न झाले आहे. हिंगणघाट पाठोपाठ आज औरंगाबाद तसेच मुंबईत घडलेल्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या घटना रोखण्यासाठी नराधमांना तत्काळ कठोर शासन व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी म्हणाल्या, आज खरंच युवती, महिला सुरक्षित नाहीत हे अधोरेखित झाले आहे. ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी आहे. विद्यार्थिनी म्हणून शिक्षणासाठी घराबाहेर पडायला आमचा जीव घाबरतो. दिवसाढवळ्या एखाद्या महिलेला जिवंत जाळले जाते, ही बातमी ऐकून घराबाहेर असुरक्षित वाटते. पालकही आपल्या मुलींना बाहेर पाठविण्यास धजावत नाहीत. अनेक मुलींना याच कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागते. त्यामुळे अनेकींना आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागते. शाळा, महाविद्यालयात जाताना टवाळखोर छेड काढतात. शिक्षण थांबवलं जाईल, या भीतीने अनेक मुली 'ब्र' सुद्धा काढत नाहीत. शिक्षण किंवा नोकरी निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या, प्रवास करणाऱ्या महिला तसेच युवती दररोज हे मरण अनुभवतात. हे कुठेतरी थांबायला हवं, अशी अपेक्षा विद्यार्थिनींनी व्यक्त केली.
दरम्यान, महिला अत्याचाराच्या सततच्या घटनांमुळे शाळा-महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक देखील चिंतित आहेत. पोलीस प्रशासनाने यासंदर्भात कठोर पावले उचलण्याची गरज आहे. आज आपल्या महाराष्ट्रात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. याचाही शासनाने विचार करायला हवा, असे काही प्राध्यापक म्हणाले.