जळगाव - बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर केलेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी फरार असलेले माजी महापौर ललित विजय कोल्हे यांना बुधवारी रात्री उशिरा श्रद्धा काॅलनीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ललित कोल्हे हे सरिता माळी यांच्या घरी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला.
पोलीस आल्याची कुणकुण लागताच कोल्हे हे माळी यांच्या घराच्या गच्चीवर लपून बसले होते. तेथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ललित कोल्हे यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडीत सुनावण्यात आली. यामुळे कोल्हे यांना ऐन कोरोनाच्या संकटात कारागृहात ‘क्वारंटाइन’ राहावे लागणार आहे.
गोरजाबाई जिमखान्याजवळ १६ जानेवारी रोजी कोल्हे व त्यांच्या साथीदारांनी बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात भाजपा नगरसेवकासह पाच जणांना आधीच अटक झाली आहे. कोल्हे हे माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक असून त्यांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.