जळगाव - कोरोना विरोधातील लढाईत आम्ही सगळे एक आहोत, यासाठी सर्वांनी आज रात्री घरातील लाईट बंद करुन दिवे, मेणबत्या, स्टॉर्च लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला जळगाव जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य नागरिकांसह नेतेमंडळींनीही आपल्या घरात दिवे लावत नरेंद्र मोदींच्या आवाहनाला साथ दिली.
भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या कोथळी येथील राहत्या घरी कुटुंबीयांसोबत दिवे लावले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार रक्षा खडसे, त्यांच्या पत्नी तथा जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष मंदाकिनी खडसे, कन्या रोहिणी खडसे आदींची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आपल्या पाळधी गावी कुटुंबीयांसोबत दिवे लावले.
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला जळगाव शहरासह जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी रात्री 9 वाजता 9 मिनिटांपर्यंत दिवे तसेच मोबाईलचा टॉर्च लावून कोरोनाच्या लढ्यात आपला हातभार लावला.