जळगाव - जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या गटबाजी उफाळून आली आहे. भाजपातून आलेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांचा गट सक्रिय झाल्यामुळे राष्ट्रवादीतील निष्ठावान कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. सध्या महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांची गच्छंती होऊन त्यांच्या जागी खडसे समर्थकाची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. पक्षश्रेष्ठींकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते? याची उत्सुकता आहे.
पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ऑक्टोबर 2020मध्ये भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विधानपरिषदेवर संधी देण्यासाठी राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत खडसेंच्या नावाचा समावेश केला. मात्र, राज्यपालांनी अद्यापही त्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. म्हणून खडसेंच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. एकीकडे ही स्थिती असताना खडसेंसोबत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनाही आपल्या पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. सध्या राष्ट्रवादीच्या स्वकियांमध्ये बेदिली असल्याने त्याचा फायदा करून घेण्यासाठी खडसे गटाकडून लॉबिंग सुरू आहे. विद्यमान महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याविषयी पक्षातील ज्येष्ठ मंडळींच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांपर्यंत या तक्रारी गेल्या आहेत. अशातच त्यांची विकेट पडण्याची शक्यता असल्याने त्यांच्या जागी आपल्या समर्थकाची वर्णी लावण्यासाठी खुद्द खडसे प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.
अशोक लाडवंजारी यांचे नाव अग्रस्थानी-
एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक असलेले अशोक लाडवंजारी हे खडसेंसोबत भाजपतून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. ते भाजपचे माजी नगरसेवक आणि माजी महानगराध्यक्ष होते. त्यांना आता राष्ट्रवादीकडून महानगराध्यक्षपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. अभिषेक पाटील यांचा राजीनामा घेतला तर अशोक लाडवंजारी यांना संधी मिळू शकते. या माध्यमातून खडसे गटाला न्याय देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी करू शकतात. याशिवाय जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात नंबर एकचा शत्रू भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीला पक्ष संघटन बळकट करावे लागणार आहे. लाडवंजारी यांना संधी देऊन राष्ट्रवादी ही चाल खेळू शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
अभिषेक पाटलांविषयी वाढल्या तक्रारी -
महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील ज्येष्ठ मंडळी नाराज आहे. ही नाराजी अनेकदा विविध आंदोलनांमधून जाहीर देखील झाली आहे. याशिवाय अभिषेक पाटील हे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जवळचे म्हणूनही ओळखले जातात. तशा तक्रारी पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांपर्यंत केल्या आहेत. मध्यंतरी महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष पद अभिषेक पाटील यांच्या मातोश्री कल्पना पाटील यांच्याकडे होते. तेव्हा एकाच घरात पक्षाची दोन पदे (महानगराध्यक्ष आणि महिला जिल्हाध्यक्ष) असल्याची ओरड केली जात होती. आता कल्पना पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे अभिषेक पाटील यांच्या पदाविषयी काय निर्णय होतो, ते पाहणे महत्त्वाचे आहे.
आक्रमक चेहरा म्हणून ओळख-
विद्यमान महानगराध्यक्ष अभिषेक पाटील हे पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. विविध प्रकारची आंदोलने, युवकांचे संघटन यामुळे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला काही प्रमाणात फायदा झाला आहे. अशा परिस्थितीतही महानगराध्यक्ष पदाची भाकरी फिरणार का? हा प्रश्न आहे.
निष्ठावंतांची नाराजी परवडणारी नाही-
राष्ट्रवादीला निष्ठावंतांची नाराजी परवडणारी नाही. पडत्या काळात ज्यांनी पक्षाला साथ दिली. त्यांच्यावर अन्याय नको, अशी भूमिका काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत आले, तेव्हा हीच भावना अनेकांनी बोलून दाखवली होती. खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश अनेकांना रुचलेला नाही. राष्ट्रवादीचे अनेक नेते तेव्हापासून हात राखून आहेत. सध्या उफाळून आलेली गटबाजी पक्षश्रेष्ठी कशी मोडून काढतात, याची उत्सुकता आहे.