जळगाव - बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्याची काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी दुपारी होळी करण्यात आली. भाजपाकडून या जाहीरनाम्यात सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारी आश्वासने देण्यात आलेली आहेत. कोरोनासारख्या महामारीचा आधार घेऊन जनतेला फसवण्याचे काम भाजपा करत असल्याची टीका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
जळगाव जिल्हा काँग्रेस तसेच 'एनएसयूआय'च्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन परिसरात एकत्र येऊन भाजपाच्या बिहार विधानसभेतील जाहीरनाम्याची होळी केली. यावेळी मोदी सरकार आणि भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनप्रसंगी एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी काँग्रेसची भूमिका मांडली.
बिहार विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपाच्या वतीने एक जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने देण्यात आलेली आहेत. परंतु, या आश्वासनांच्या माध्यमातून भाजपा केवळ सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये भाजपाने असे जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. पण भाजपाने एकही आश्वासन पाळल्याचे दिसून येत नाही. बिहारमध्येही सर्वसामान्य जनतेचा असाच भ्रमनिरास होणार आहे, असे देवेंद्र मराठे म्हणाले.
कोरोनाच्या मुद्द्याचा राजकीय फायद्यासाठी वापर-कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडालेला आहे. परंतु, भाजपाकडून कोरोनाच्या मुद्द्याचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात आहे. बिहारमध्ये भाजपाची सत्ता आली तर लोकांना कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. कोरोनाच्या लसीची सर्वत्र आतुरतेने वाट पाहत असताना भाजपाने अशा पद्धतीने त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे दुर्दैवी आहे, अशीही टीका यावेळी आंदोलकांनी केली.