जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीच्या विषयावरून सध्या जळगाव जिल्हा भाजपमधील दोन गटात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही गटातील सदस्य सोशल मीडियावर एकमेकांची उणीदुणी काढत असल्यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या निष्ठावंतांना विधानपरिषदेची संधी नाकारून नवख्यांना उमेदवारी बहाल केल्याने राज्यस्तरावर ज्याप्रमाणे परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे, त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर देखील भाजपत सुंदोपसुंदी सुरू आहे.
विधानपरिषद निवडणुकीची घोषणा होताच, एकनाथ खडसे यांनी 'आपल्याला राज्याच्या राजकारणात रस असून, विधानपरिषदेवर आपल्याला संधी मिळावी', अशी जाहीर अपेक्षा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. त्यानंतर राज्याच्या प्रदेश समितीने तशी शिफारस देखील केंद्रीय नेतृत्त्वाकडे केल्याचे सांगितले जात होते. राज्यसभेच्या वेळी नाव चर्चेत असताना तेव्हा संधी न मिळाल्याने खडसेंच्या राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने त्यांची अपेक्षा रास्त होती. मात्र, केंद्रीय नेतृत्त्वाकडून जाहीर केलेल्या चारही नावांमध्ये एकही नाव चर्चेतील नव्हते. सर्व नावे नवखी आणि वादग्रस्त नेत्यांची होती. त्यामुळे भाजपच्या राज्यस्तरीय गोटात एकच खळबळ उडाली. खडसेंनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत भाजपच्या राज्याच्या नेतृत्त्वाला लक्ष्य केले. खडसेंच्या टीकेचा सर्व रोख हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. त्यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारी वाटपात आपल्याशी दगाफटका केल्याची भावना खडसेंच्या मनात आहे.
दरम्यान, खडसे राज्याच्या नेतृत्त्वाला लक्ष्य करत असल्याने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, यामुळे खडसेंच्या बाजूने असलेल्या बहुजन कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. खडसे, मुंडे यांच्यासारख्या बहुजन नेत्यांवर सातत्याने अन्याय का? असा प्रश्न हे कार्यकर्ते आता जाहीरपणे विचारत असून, त्यामुळे भाजपातील गटबाजी अधोरेखित झाली आहे.
युती सरकारच्या काळात खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना 12 खात्यांचे मंत्रिपद सोडावे लागले होते. त्यानंतर दीर्घकाळ वाट पाहूनही त्यांची मंत्रिमंडळ वापसी झाली नाही, ही बाब खडसेंसह त्यांच्या समर्थकांच्या पचनी पडली नाही. तेव्हापासून खडसेंना मानणारा गट उघडपणे गिरीश महाजन समर्थक गटावर नाराज आहे. त्या काळात सत्तेत वरचष्मा असलेल्या गिरीश महाजन यांच्या गटाने देखील खडसे समर्थकांना कधी जवळ करण्याचा प्रयत्न केला नाही. यातच दोन्ही गटांमधील वितुष्ट वाढतच गेले. दरम्यानच्या काळात ही धग काहीशी कमी झाली होती. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा दोन्ही गटांमधील विस्तव धगधगत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्याच्या नेतृत्त्वावर आहे खडसे समर्थकांची तीव्र नाराजी-
विधानसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीवेळी एकनाथ खडसे यांचे नाव महाराष्ट्रातून पुढे आले होते. परंतु, त्या वेळी खडसेंना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळू शकली नव्हती. खडसे यांचे राजकीय पुनर्वसन व्हावे, म्हणून त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळेल, अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा खडसेंना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने डच्चू दिला. त्यामुळे खडसे आणि त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. खडसेंना जाणीवपूर्वक पक्षातून बाहेर लोटले जात असल्याची भावना खडसे समर्थकांमध्ये आहे. म्हणूनच ते राज्याच्या नेतृत्त्वावर कमालीचे नाराज झाले आहेत. सध्या खडसे समर्थक सोशल मीडियावर 'ॲक्टिव्ह' असून ते खडसेंच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष करणाऱ्या पोस्ट, दोघांची नावे जाहीरपणे न घेता सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. काही जुने व्हिडिओ, भाषणांच्या क्लिप देखील सोशल मीडियावर फिरताहेत.
अशा आहेत सोशल मीडियावरील काही लक्षवेधी पोस्ट-
'आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे सोपं असते... घाम गाळून पीक घ्यावे लागते, पिकवून धान्याचे पीठ तयार करणे खूप कठीण'
'आज निर्णय घेणारे जेव्हा अंगणात रांगत होते... तेव्हा हा माणूस संघर्ष करत दारोदार भटकत पक्षाची बांधणी करत होता, हा या माणसाचा गुन्हा आहे काय?'
'प्रदीर्घ अनुभव आणि अभ्यासातून फडणवीस सरकारला सुरुवातीच्या काळात मौलिक प्रशासकीय मार्गदर्शन केले, हा या माणसाचा गुन्हा आहे काय?'
'खानदेशात भाजपचे रोपटे लावले... संघर्ष व काबाडकष्टातून त्याचा वटवृक्ष केला... हा या माणसाचा गुन्हा आहे काय?'
दरम्यान, आता सोशल मीडियावर रंगलेला हा कलगीतुरा किती काळ चालतोय आणि पुढे काय वळण घेईल, हे येत्या काही दिवसांत कळेल.