जळगाव - जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने महाविकास आघाडी व भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आज (रविवारी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याच मुद्द्याला हात घालत भाजप खासदार रक्षा खडसेंना जोरदार टोला लगावला. 'खासदारालाच अर्ज भरता येत नसेल तर तो काय गुलाबराव पाटलाने केला काय?' अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी रक्षा खडसेंवर निशाणा साधला.
जळगाव शहरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप सोहळा रविवारी दुपारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यानंतर मंत्री पाटील माध्यमांशी बोलत होते. जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबत त्यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केले.
एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज चुकला तर ठीक आहे, पण खासदाराचा?
मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, 'एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद होत असेल, त्याला कळत नसेल, तर त्याने असा आरोप केल्यास ठीक आहे. पण खासदाराचाच अर्ज बाद होत असेल तर तो काय गुलाबराव पाटलाने बाद केला का? असा खोचक प्रश्नही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. अर्ज तुम्ही चुकीचा भरायचा, तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने बाद करायचा. यात माझा रोल नाही. निवडणूक निर्णय अधिकारी काय मी नियुक्त केलेत का? त्यामुळे अर्ज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाद केले. असे आरोप भाजपने करावे, हे चुकीचे आहे. शेवटी अर्ज भरणाऱ्याला हे कळाले पाहिजे. भाजप नेते अपील करू शकतात. त्यांनी आरोप जरूर केले पाहिजेत. पण त्यात तथ्य असले पाहिजे, असा चिमटाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढला.
जिथे जिल्ह्याचे हित, तिथे सर्वांनी एकत्र रहावे
जिल्हा बँकेची निवडणूक यापूर्वीही सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र लढली होती. मी पण यावेळी पालकमंत्री म्हणून त्यासाठी प्रयत्न केले. पण शेवटी तसे झाले नाही. मला आडमुठेपणा करायचा राहिला असता तर मी सुरुवातीलाच 'मला निवडणूक लढायची आहे', असे म्हटले असते. पण शेतकऱ्यांची बँक म्हणून माझे प्रयत्न बिनविरोधाचे होते. जिथे जिल्ह्याचे हीत आहे, तिथे सर्वांनी एकत्र रहावे, अशी माझी कायम भूमिका असेल, असेही पाटलांनी सांगितले.
नवरदेव घोड्यावर बसलाय, बघूया वरातीत काय म्हणतोय तो?
जिल्हा बँकेत माघारीनंतर सर्वपक्षीय एकत्र येतील, अशी चर्चा असल्याचे पत्रकारांनी विचारले असता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आतापर्यंत 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 'नवरदेव घोड्यावर बसलाय, बघूया वरातीत काय म्हणतोय तो?', असे सांगत त्यांनी उत्सुकता ताणून धरली.
हेही वाचा - आरोग्य विभाग परीक्षा गोंधळ : घडलेल्या प्रकाराची नक्कीच चौकशी होणार - जिल्हाधिकारी