जळगाव- जिल्ह्यात यावर्षी पावसाने तब्बल दीड महिना उशिराने हजेरी लावली. मात्र, जुलै महिन्याच्या उत्तरार्धात दाखल झालेल्या पावसाने अवघ्या १५ दिवसात संपूर्ण तूट भरुन काढली. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६३ टक्के इतका पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील दुष्काळ मिटला असला तरी, काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
जिल्ह्यात २२ जुलैनंतर पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला एक ते दोन पाऊस चांगले पडल्यावर पुन्हा पाऊस थांबला होता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दाखल झालेल्या पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला. गेले दोन आठवडे दमदार पाऊस पडत होता. शनिवारी पावसाने उघडीप दिली. सूर्यदर्शन झाल्याने शेतीकामांची लगबग सुरू झाली आहे. पिकांवर औषध फवारणी, निंदणी अशी कामे करताना शेतकरी दिसून येत आहेत. जिल्ह्यातील जळगाव, यावल, रावेर, जामनेर, भुसावळ, मुक्ताईनगर तसेच अमळनेर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके कुजली आहेत. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका उडीद, मूग, सोयाबीन तसेच कापसाच्या पिकांना बसला आहे. एकीकडे दमदार पावसामुळे दुष्काळ मिटला असला तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाण्याची भीती आहे.
जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६३.३ मिलीमीटर इतके आहे. मागील वर्षी १० ऑगस्टपर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त ३९.१ टक्के म्हणजेच २५७.१ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. परंतु, यावर्षी १० ऑगस्टपर्यंत ४१८.५ मिलीमीटर इतका पाऊस पडला असून, तो वार्षिक सरासरीच्या ६३ टक्के इतका आहे. या पावसामुळे नद्या-नाले, बंधारे तसेच विहिरी तुडूंब भरल्या आहेत. जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून पावसाची संततधार सुरू होती. मात्र, आता पाऊस थांबला आहे. पावसाने उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी आंतरमशागतीची कामे तसेच कीड व रोगनियंत्रणासाठी फवारणी उरकून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून चांगला पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. मात्र, यावर्षी वरुणराजाची चांगली कृपा झाल्याने शेतकरी आनंदी आहे. ज्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी महसूल विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्यावी, अशी मागणी होत आहे.