जळगाव - मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. अनेक तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीप पिकांचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे, शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो झाले आहेत. मोठ्या धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी मुंबई येथून संपर्क करून आढावा घेतला.
पावसामुळे नदीकाठच्या गावांबरोबरच जिल्ह्यातील इतर ठिकाणीही खरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन, मूग, कापूस व इतर पिकांची नासाडी झाली आहे. तर रावेर आणि यावल भागात केळी बागांचेही नुकसान झाले आहे.
याशिवाय काही ठिकाणी नदी, नाल्यांना पाणी आल्याने शेतजमिनीचे तसेच नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानीची माहिती घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा अधीक्षक आणि संबंधित अधिकारी संभाजी ठाकूर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, हवामान खात्याने जिल्ह्यात येत्या शनिवारपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने पुढचे काही दिवस पाटबंधारे विभाग तसेच नागरिक, शेतकरी व प्रशासनानेही या काळात दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.